विरार : विरार पूर्वेकडील वज्रेश्वरी रोडवरील उसगाव येथे पाण्याच्या पिंपात कपड्याने बांधून ठेवलेला मृतदेह सापडला असल्याची घटना ताजी असताना शनिवारी विरार, मारंबळपाडा जेटीकिनारी एका अनोळखी महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.विरार पश्चिमेकडील मारंबळपाडा गावाजवळ असलेल्या जेटीजवळ एका २५ ते ३० वर्षीय महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. या महिलेच्या शरीराला दगड बांधलेला होता. अनोळखी व्यक्तींनी तिच्या गळ्यात दगड बांधून तिला नदीपात्रात ढकलून दिले असावे, असा अंदाज वर्तविला जात आहे. या तरुणीने निळ्या रंगाची पॅन्ट घातली होती. तरुणीचा मृतदेह गावामधील स्थानिक नागरिकांना आढळला. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर अर्नाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिली.
कुजलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 8:15 AM