वसई : वसई पूर्वेतील राजवली खदानीत बुडालेल्या २० वर्षीय तरुणाचा मृतदेह तब्बल २६ तासांनंतर सापडला. अग्निशमन दल आणि वालीव पोलिसांच्या पथकाने खदानीतून त्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी बाहेर काढल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख दिलीप पालव यांनी ‘लोकमत’ला दिली.वसई पूर्वेतील गोखिवरेस्थित पाच-सहा जण सोमवारी सकाळी ८.३० वाजता सायकलिंग करत राजवली खदानी परिसरात गेले होते. पोहण्याचा मोह आवरता न आल्याने हे सर्व जण खदानीच्या पाण्यात उतरले खरे, मात्र यापैकी अभिजित वानखेडे (२०) याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. ग्रामस्थांच्या मदतीने घटनास्थळी वालीव पोलीस व अग्निशमन दलाचे जवान पोहचून शोधकार्य तर सुरू झाले, मात्र सोमवारी दिवसभर त्याचा मृतदेह मिळाला नव्हता. मात्र मंगळवारी सकाळी २६ तासांच्या शोधकार्यानंतर अखेर अभिजीतचा मृतदेह खदानीच्या पाण्यात दूर खोलवर आढळून आला. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी वन विभाग व वालीव पोलिसांनी या खदानीकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले असतानादेखील हे तरुण या ठिकाणी गेले होते.>फेब्रुवारीतही बुडाल्या होत्या दोन मुलीफेब्रुवारी महिन्यातदेखील याच खदानीत दोन मुली बुडाल्या होत्या. त्यानंतर या खदानी परिसरात जाऊ नये, असे फलक लावण्यात आले होते. मात्र प्रशासनाच्या व पोलिसांच्या सूचना फलकांकडे पर्यटक व तरुणाई नेहमीच दुर्लक्ष करतात, हे या घटनेमधून पुन्हा सिद्ध झाले आहे.
वसईच्या खदानीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 1:16 AM