पारोळ : वसई-विरारमध्ये शाळेचा बोगस दाखला बनवून देणारी टोळी सक्रीय झाली असून त्यामुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे. आधीच वसई तालुक्यातील तहसीलदार कार्यालयात रोज शासकीय कामकाजासाठी लागणारे विविध दाखले बनवण्यासाठी हजारो जण येतात. त्यात आता बोगस शाळेचे दाखले जोडून दाखले मिळवण्यासाठी नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे दोन प्रकार समोर आले आहेत. रिक्षा बॅज काढण्यासाठी शाळेचा बोगस दाखला बनवून त्याआधारे रहिवास प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दोघा जणांनी तहसीलदार प्रशासनाकडे अर्ज केला होता. परंतु अर्ज छाननीत शाळेचा दाखला बोगस असल्याचे निष्पन्न झाल्याने दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वकील रफिक शेख शाईन याने रिक्षा बॅच काढण्यासाठी रहिवास दाखला मिळावा यासाठी दि. २० डिसेंबर २०१८ रोजी काशिदास घेलाभाई हायस्कूल आगाशी यांच्या शाळेचा बोगस दाखला बनवून वय, राष्ट्रीयत्व, अधिवास प्रमाणपत्र घेवून दाखल्याधारे १५ वर्षांचा रहिवास दाखल्यांसाठी तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला होता. मात्र अर्जासोबत जोडलेल्या शाळेचा दाखला बोगस असल्याचे निष्पन्न झाले. तसेच दुसऱ्या ठिकाणी गिरीजाशंकर प्रियुगनाथ दुबे यांनी रिक्षा बॅज काढण्यासाठी पॅटक टेक्निकल हायस्कूल, मुंबई या शाळेचा दाखला मिळवला होता. तपासाअंती तो बोगस असल्याचे निष्पन्न झाले. या दोघांविरोधात वसई पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वसई, विरारमध्ये परप्रांतीयांचे रिक्षा बॅज काढण्यासाठी बोगस दाखले बनवून देणारी टोळी सक्र ीय असल्याची भीती व्यक्त होत आहे. तर प्रशासनाचे काम वाढले आहे.अधिकाऱ्यांची दिशाभूल करून वय, राष्ट्रीयत्व, अधिवास प्रमाणपत्र, बोगस बनवून ते मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सदर दाखला बोगस असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी दोघांविरोधात वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपासात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.-प्रदीप मुकणेनायब तहसिलदार,महसूल