नालासोपारा : वसईच्या तुंगारफाटा येथील एका कंपनीत शनिवारी दुपारी अधिक प्रेशरमुळे बॉयलरचा स्फोट झाल्याने बाजूच्या कंपनीत काम करणाऱ्या १८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. स्फोट इतका भीषण होता की दोन्ही कंपनीची सामायिक भिंत तुटली आहे. या प्रकरणी कंपनीच्या मालकांवर निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा वालीव पोलिसांनी दाखल केला आहे.मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या शेजारी असलेल्या वसईच्या तुंगारफाटा येथील नीलिमा मोटार कंपाउंडमध्ये डॉल्फिन कंपनीच्या शेजारी असलेल्या हेफ्टी कंपनीत शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अधिक प्रेशरमुळे बॉयलरचा स्फोट झाला आहे. हेफ्टी कंपनीत सुरक्षिततेसाठी उपाययोजना न करता त्याचे काम चालू ठेवल्यावर बॉयलरमध्ये अधिक प्रेशरमुळे स्फोट होऊन दोन्ही कंपन्यांच्या मधील सामाईक भिंत तुटली. या भीषण स्फोटात डॉल्फिन कंपनीत काम करणारा कामगार नेमुद्दीन सलमानी (१८) हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अन्वर सिद्दिकी, विनोद यादव हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कंपनीचे मोठे नुकसानया स्फोटामुळे डॉल्फिन कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डॉल्फिन कंपनीचे मालक चेतन जोगाणी (४७) यांनी वालीव पोलीस ठाण्यात हेफ्टी कंपनीचे मालक सुधाकर यांच्याविरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याने एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. कंपनी मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास करत आहे.- कैलाश बर्वे, पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे
वसईच्या हेफ्टी कंपनीत बॉयलरचा स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2021 7:02 AM