पंकज राऊत , बोईसरअनेक वर्षांपासून येथील क्रीडा स्पर्धा, राजकीय सभा व सामाजिक कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध असणारे एमआयडीसी मैदान रामदेव सिंथेटिकस या उद्योगाच्या मालकीचे होणार, या लोकमतच्या वृत्ताने गुरुवारी बोईसरकरांना एकवटले. ‘मैदान बचावासाठी फक्त १४ दिवस’ या मथळ्याखाली हे वृत्त प्रकाशित झाले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी खैरापाडा ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या बैठकीत मैदानाची (प्लॉट) विक्री प्रक्रिया त्वरित एमआयडीसीने थांबवावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. या वेळी मैदान बचाव संघर्ष समितीचीही स्थापना करण्यात आली.येथील उड्डाणपुलाजवळील ओपन स्पेस (ओएस) ४६/२ या ५१३१९ स्क्वेअर मीटरच्या प्लॉटपैकी ३४३१९ स्क्वेअर मीटर जागा २०१० साली डी. डेकोर एक्सपोर्टला उद्योग उभारण्याकरिता दिल्यानंतर बोईसरमध्ये सर्वपक्षीय मोठे आंदोलन झाले होते. त्यानंतर, १७ हजार वर्गमीटर क्षेत्रफळाची जागा मैदानासाठी राखीव ठेवण्यात यश आले होते. मात्र, एमआयडीसीने बोईसर, खैरापाडा व सरावली ग्रामपंचायत क्षेत्रातील एकमेव मैदानही विकण्याचा घाट घातल्याच्या वृत्ताने गावकऱ्यांमध्ये संताप पसरला. आजच्या बैठकीत शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, आरपीआय, मनसे आदी मुख्य राजकीय पक्षांचे ज्येष्ठ पदाधिकारी व पुढारी, भूमिसेना, स्थानिक विचार मंच, सिटीझन फोरम आॅफ बोईसर-तारापूर, निर्धार समाजसेवी संघटनेचे पदाधिकारी बोईसर, खैरापाडा व सरावली ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच तसेच सदस्य पालघर जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य रोटरी तसेच लायन्स क्लबचे सदस्य व स्थानिक क्रीडा संघटनेचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकमेव मैदानासाठी बोईसरकर एकवटले
By admin | Published: August 07, 2015 10:53 PM