पारोळ : कुणी कुणाच्या नावाचा उपयोग करून एखाद्या घटनेशी त्याचे नाव जोडून फसवेल, याचा काही नेम नाही. हे या घटनेवरून समजते. विरारच्या जयश्री निरंजन या महिलेच्या बाबतीत असा प्रसंग ओढवला की, याकूब मेमन फाशीसंदर्भात धमकीने भरलेले पत्र तिच्या नावाने एका अज्ञात इसमाने मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवले. परंतु, मुंबई पोलिसांना ते पत्र याकूबच्या फाशीनंतर मिळाले.या पत्रामध्ये असे लिहिले होते की, जर याकूबला फाशी दिली तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही मुंबईत पुन्हा सीरियल बॉम्बस्फोट घडवू. या पत्रामध्ये कुठे बॉम्बस्फोट होतील, याची ठिकाणेही सांगितली होती. त्या ठिकाणांमध्ये एका रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे. या पत्रामध्ये पोलिसांना गलिच्छ शिव्याही देण्यात आल्या होत्या. या पत्रावर जयश्री निरंजन असे नाव लिहून तिचा फोटो व घरचा पत्ता पण पत्राच्या पाकिटामध्ये ठेवला होता. मुंबई क्राइम ब्रँचने या पत्राबाबत चौकशी केली असता या महिलेचा या पत्राशी काही संंबंध नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. या महिलेचे कुणीतरी वैर काढण्यासाठी तिला या पत्राच्या माध्यमातून फसवले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस याबाबत ज्या पोस्ट आॅफिसमधून हे पत्र मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवले, याचा शोध घेत आहेत. (वार्ताहर)
पुन्हा बॉम्बस्फोट घडवू!
By admin | Published: August 04, 2015 3:23 AM