बोईसर - तारापूर एमआयडीसीमधील सर्वांत मोठ्या कापड उत्पादन करणाऱ्या बॉम्बे रेयॉन फॅशन लि. या कारखान्याच्या शेकडो कामगारांनी पगार व न्याय मिळत नसल्याने अखेर कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर काम बंद आंदोलनास सुरुवात केली आहे. मार्च महिन्यापर्यंतचा पगार मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार कामगारांनी केला आहे.बॉम्बे रेयॉनच्या कामगारांचा जानेवारीपासूनच्या थकीत पगाराचा प्रश्न चिघळला आहे. मागील तीन महिन्यांपासून पगारासाठी आंदोलन करणाºया कामगारांना कामावर न घेता इतर काही कामगारांना कामावर बोलावून त्यांना पगार दिल्याने कामगार संतप्त झाले आहेत. थकीत पगाराअभावी उपासमारीची वेळ आल्याने या पीडित कामगारांनी अखेर कामबंद आंदोलनास सुरुवात केली आहे. सोशल डिस्टसिंग पाळून हे आंदोसन सुरू करण्यात आले असून आंदोलनाचा आजचा चौथा दिवस होता. लॉकडाऊनच्या कालावधीत पाच वेळा आंदोलने करून व कंपनी व्यवस्थापनाने लेखी आश्वासन दिल्यानंतरही कामगारांना पगार दिला नाही. दरम्यान, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर काही मर्जीतल्या कामगारांना त्यांचा पगार देऊन पुन्हा कामावर बोलावून कंपनी सुरू करण्यात आली. मात्र आंदोलन करणाºया कामगारांना पगारही दिला नाही व कामावरही न घेतल्याचे आंदोलक कामगारांनी सांगितले. तर या कामबंद आंदोलनात सुमारे १०० हून अधिक महिला कामगार सहभागी झाल्या आहेत.
बॉम्बे रेयॉन कामगारांचे आंदोलन, भरपावसात प्रवेशद्वारावर निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 11:59 PM