लोकमत न्यूज नेटवर्कवसई : महापालिकेने मांस विक्री करणाऱ्यांना आता परवाना बंधनकारक केला असून मांस विक्रीसाठी अनेक अटी आणि शर्ती लादण्यात आल्या आहेत. त्यांचा भंग करणाऱ्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. वसई तालुक्यातील लोकांचे आरोग्य आणि भावना लक्षात घेऊन महापौर प्रवीणा ठाकूर यांनी मांस विक्री करणाऱ्यांवर कडक निर्बंंध घालण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानंतर या कारवाईला सुरुवात झाली आहे.महापालिकेच्या प्रभाग समिती एफमध्ये सध्या मांस विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे. त्यानंतर सभापती अब्दुल हक पटेल आणि आरोग्य निरीक्षक अविनाश गुंजाळकर यांनी मांस विक्रेत्यांची एक बैठक बोलावून त्यांना महापालिकेच्या अटी शर्तींची माहिती दिली. मांस विक्री करण्यासाठी प्रत्येकाला तीन महिन्यात परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तो न घेणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. शाळा आणि धार्मिळ स्थळांनजिक मांस विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. मशिदींसह कुठल्याही ठिकाणी मांस विक्री करायची असेल तर परिसरातील रहिवाशांची ना हरकत परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. दुकानांसमोर पडदा टाकणे, मांस झाकून ठेवणे, दुकानात कमीत कमी चार फूट उंचीच्या टाईल्स बसवणे, दुकानात पाण्याची व्यवस्था करणे आदी अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींची पूर्तता केल्यानंतरच परवाना दिला जाणार आहे.या कारवाईबाबत विक्रेत्यांत नाराजी तर जनतेते समाधान व्यक्त होते आहे.
मांसविक्रीसाठी आता परवाना बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 4:02 AM