नालासोपारा - मुंबई, ठाणे आणि इतर भागांमध्ये अक्षरश: ढगफुटीसारख्या कोसळलेल्या पावसाने बुधवारी (4 सप्टेंबर) जनजीवन कोलमडून गेले. मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक नऊ तासांहून अधिक काळ बंद पडली. तसेच नालासोपाऱ्यात देखील जोरदार पावसामुळे रेल्वे रूळांवर आणि अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले होते. नालासोपाऱ्यात वाहून गेलेल्या चिमुकल्याचा मृतदेह सापडला आहे.
नालासोपाऱ्यातील संतोष भुवन येथून बुधवारी रात्री एक सहा वर्षाचा चिमुकला वाहून गेला होता. पाण्याचा निचरा होण्यासाठी गटाराची झाकणे उघडण्यात आली होती. त्यावेळी हा चिमुकला गटारात पडून वाहून गेला होता. घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने शोधकार्य सुरू केले होते. त्यानंतर आता ओस्तवाल नगर येथे या चिमुकल्याचा मृतदेह सापडला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात दिवसभरात सरासरी 374 टरपेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला. रेल्वेचे तिन्ही मार्ग कोलमडल्याने सर्व प्रमुख रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली. रस्त्यावरील खड्डे, अवजड वाहने यामुळे रस्त्यांवरील वाहतूक मंदगतीने सुरू होती. त्यातच पाणी साचल्याने गाड्या बंद पडल्या. अडकून पडल्या. त्यामुळे कोंडीत भर पडली. कमी दृश्यमानतेचा परिणाम विमानसेवेवरही झाला. विमाने तासभर विलंबाने धावत होती.