लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : जीभ सराईतपणे आत ओढून मुका असल्याचे भासवणाऱ्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलाच्या घरातून चोरीचे तब्बल २२ मोबाइल व ५ लॅपटॉप असा सव्वातीन लाखांचा मुद्देमाल काशिमीरा पोलिसांनी जप्त केला. आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले असून त्याच्याकडे मुका असल्याचे आंध्र प्रदेश न्यायालयाकडील बनावट प्रमाणपत्र सापडले आहे. या कारवाईच्या निमित्ताने सकाळच्या प्रहरी दार उघडे पाहून मोबाइल, लॅपटॉप, पाकीट आदी वस्तूंची चोरी करणारी टोळीच उघडकीस आली असून कोणी विचारणा केल्यास ते मुके असल्याचे सांगून स्वत:ची सुटका करून घेत. काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेणकरपाडा येथील कृष्णस्थळमधील वसुधा इमारतीत राहणारे अमित जनार्दन महाजन यांचे दार सकाळी उघडे होते. सकाळी ७.४० च्या सुमारास घरातील चार्जिंगला लावलेले दोन मोबाइल चोरीला गेले. इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजवरून एका अनोळखी मुलाने घरात शिरून मोबाइल चोरल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अजय मांडोळे, राजेश पानसरे, कवडे, पोलीस नायक परकाळे यांनी चोरट्याचा तपास सुरू केला. तपासादरम्यान मंगळवारी त्यांना सीसीटीव्ही फुटेजमधील वर्णनाचा १३ वर्षांचा मुलगा मुन्शी कम्पाउंड भागात सापडला. त्याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता तो मुका असल्याचे हातवारे करून बोलू लागला. चोरांच्या टोळीत तीन-चार कुटुंबे?या परिसरात पहाटे दार उघडे पाहून मोबाइल, लॅपटॉप, पाकीटे चोरून नेणारी टोळीच कार्यरत आहे. येथे तीनचार कुटुंबे राहत होती. हा मुलगा पोलिसांच्या हाती लागताच ते सर्व पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
मुलाकडे सव्वातीन लाखांचे २२ मोबाइल, ५ लॅपटॉप
By admin | Published: June 02, 2017 4:47 AM