लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : एकीकडे निष्क्रिय, अविश्वसनीय, बेभरवशाचे असे तिघाडी सरकार काम करीत असून दुसरीकडे लोकांच्या मागण्यांसाठी आयोजित मोर्चा दडपशाहीने थांबविला जातो. या मुस्कटदाबीचा निषेध करीत पुढच्या वेळी जमावबंदी मोडून हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक देऊ, असा इशारा जिल्ह्याचे प्रभारी आ. संजय केळकर यांनी दिला.
जिल्ह्यातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी भाजपच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी मोखाडा, जव्हार, विक्रमगड, डहाणू, तलासरी, पालघर आदी तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते पालघरच्या दिशेने निघण्याच्या तयारीत असताना पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश आणि कोरोना प्रादुर्भावाचे कारण देत त्यांना ताब्यात घेतले. या वेळी जिल्ह्यातील प्रत्येक रस्त्या-रस्त्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने जिल्ह्याला छावणीचे रूप आले होते. पोलिसांच्या कृतीचा भाजपने निषेध नोंदवला आहे. या मोर्चासाठी माजी पालकमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण, आ. निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, ज्येष्ठ नेते बाबजी काठोळे, माजी आ. पास्कल धनारे, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सरचिटणीस संतोष जनाठे, सुशील औसारकर, सुजित पाटील, अशोक वडे, युवाध्यक्ष समीर पाटील, पुंडलिक भानुशाली आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याने अनेकांना पोलिसांनी ठाण्यात आणून स्थानबद्ध करून नंतर सोडण्यात आले. त्यामुळे हा मोर्चा रद्द करण्यात आल्याचे भाजपने जाहीर केले.
या वेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत भाजपने महाआघाडी सरकारवर हल्ला चढवीत राज्यात सरकारच्या अनेक घटक पक्षांकडून मोर्चे काढले जात असताना भाजपचा आजचा पालघरमध्ये आयोजित मोर्चा रद्द करायला लावून तिघाडी सरकारने आम्ही दडपशाहीनेच वागून दाखवू हे स्पष्ट करून दाखविल्याचा आरोप आमदार चव्हाण यांनी केला.