वाडा : शेताच्या धन्यापेक्षाही शेतमजुराचा थाट भारी असल्याचे चित्र वाडा तालुक्यात सर्रास दिसते आहे. दहा ते पंधरा वर्षांपासून मजुरांचा हा थाट वाढतोच आहे. सकाळची न्याहारी, दुपारचे जेवण तसेच रात्रीचे जेवण, अशी या मजुरांची मिजास राखावी लागते. शिवाय, दिवसभराचे काम झाल्यावर ‘उद्या लवकर या, दुसऱ्या कोणाला भरोसा देऊ नका’, अशा विनवण्या देखील शेतमालकाला कराव्या लागतात.
शेतात राबायला मजूर मिळणार नाहीत अशी सध्या परिस्थिती आहे. भात हे वाड्यातील पारंपरिक पीक. भाताची लावणी, बिनणी आणि कापणी या पिकातील त्याची कामे ठरलेल्या वेळीच करावी लागतात. गेल्या काही वर्षांपासून येथे कारखानदारी आल्याने मजुरांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे भात शेतीसाठी मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यासाठी जव्हार, मोखाडा, तलासरी, नाशिक येथून मजूर आणावे लागतात. काही स्थानिक मजूर येतात त्यांची चांगली बडदास्त ठेवावी लागते. सध्या लावणीची कामे सर्वत्र जोरात सुरू आहेत. मजुरांचा तुटवडा जाणवतो आहे. शेतात काम करायला मजूर मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे.