वसई : वसई - विरार महापालिकेच्या २०१९-२० वर्षाच्या बजेटला बुधवारी झालेल्या महासभेत मंजूरी देण्यात आली. मात्र मागील सात वर्षापासून घोषणा केलेल्या अनेक योजना या बजेटमध्ये नव्याने मांडण्यात आल्या आहेत.
१८५७ कोटी ६५ लाख रु पये खर्च आणि ४०५ कोटी १५ लाख रुपये शिलकीचा असा एकूण २२६२ कोटी रुपयांचे बजेट बुधवारी झालेल्या विशेष महासभेत मंजूर करण्यात आले. आयुक्तांनी सादर केलेल्या बजेटमध्ये स्थायी समितीने अनेक सुधारणा केल्या होत्या. २०१९-२० मध्ये प्रारंभिक शिल्लक ४०५ कोटी १५ लाख १ हजार ८५७ कोटी ६८ लाख जमा आणि २ हजार २० कोटी ६७ लाख रुपये खर्च असा एकूण २२६२ कोटी रुपयांचे बजेट सादर केले. मागील आठवड्यात ते सभागृहापुढे सादर करण्यात आले होते. बुधवारी त्यावर चर्चा झाली. विविध सदस्यानी आपल्या सूचना मांडल्यानंतर ते मंजूर करण्यात आले.
वसई विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे. अनेक आकर्षक घोषणा, नवे प्रकल्प आणि योजनांची तरतूद केली असली तरी मागील सात वर्षापासून या सर्व योजना प्रत्येक बजेटमध्ये होत्या. बहुमजली वाहनतळ, रो रो सेवा, निसर्ग उद्यान, वस्तू संग्रहालय, स्कायवॉक, सरकते जीने, शवविच्छेदन गृह, अद्ययावत अभीलेखा कक्ष, मोबाईल मनोरे धोरण, फायर आॅडीट, वाहनतळ व्यवस्था आदींचा समावेश आहे. परंतु महापालिकेने त्याची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे या सर्व बाबी पुन्हा नव्या बजेटमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
बुधवारी स्थायी समितीने सभागृहात सादर केलेल्या बजेटवर चर्चा झाली. त्याला शिवसेना, भाजपा या विरोधा पक्षांनीही सूचना करून पाठिंबा दिल्यानंतर बहुमताने हे बजेट मंजूर करण्यात आले. नगरसेवक अजीव पाटील, प्रविणा ठाकूर, किरण भोईर, किरण चेंदवणकर, हार्दिक राऊत, आपटे, माया चौधरी, निलेश देशमुख यांनी यावेळी काही मागण्यांबाबत सभागृहाचे लक्ष वेधले तर काही सदस्यांनी बजेट मधील त्रुटी विषद केल्या.