- हितेन नाईक, पालघर
विक्रमगड तालुक्यातील खुडेद (घोडीचा पाडा) येथील ९ लाख ९९ हजार ५३० रुपये किमतीचे मंगल कार्यालय ‘चोरीला’ गेल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर ही चोरी लपविण्यासाठी मंगल कार्यालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचा प्रयत्न आता सुरु आहे. असे असले तरी ही भ्रष्टाचाराची प्रवृत्ती रोखण्यासाठी ठेकेदारासह, संबाधित विभागातील दोषींवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी लोकमतला दिली.आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत ठक्कर बाप्पा योजनेतून सन २०१४-१५ मध्ये या मंगल कार्यालयाच्या इमारतीच्या ९ लाख ९९ हजार ५३० रुपये किमतीच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर सप्टेंबर २०१५ मध्ये हे काम सुरु झाले आणि ५ जानेवारी २०१६ मध्ये त्या पाड्यात ते बांधून झाल्याचा अहवाल ज्या विभागाने निधी उपलब्ध करून दिला त्या जव्हारच्या आदिवासी विकास प्रकल्प विभागाने आणि ज्या सार्वजनिक बांधकामने ते पूर्ण केले. त्याचे कार्यकारी अभियंता नितीन पालवे आणि उपकार्यकारी अभियंता सुदाम ससाणे यांनी सादर केला होता. हे मंगल कार्यालय बांधलेच नसल्याने ते चोरीला गेल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित पाड्यातील लोकांनी आपल्यासाठी बांधलेल्या मंगल कार्यालयाचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेक वेळा केला असता घोडीचा पाडाच काय तर परिसरातील इतर कोणत्याही पाड्यात असे मंगल कार्यालय बांधण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात तक्र ारी करण्यात आल्यानंतर जव्हारच्या आदिवासी विभागाचे प्रकल्पधिकारी बाबासाहेब पारधे यांनी ही खुडेदच्या घोडीचा पाडाला स्वत: भेट देवून लोकांसमोर चौकशी केली असता मंगल कार्यालय बांधलेच नसल्याचे त्यांना दिसून आले. तसा अहवालही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. पूर्ण मंगल कार्यालयाची इमारतच चोरीला गेल्याने सर्वत्र गवगवा झाल्यानंतर प्रशासन हलले आणि गुन्हे दाखल करण्याची प्रक्रि या सुरु झाली. सुमारे १० लाखाची इमारत न बांधता ती बांधली असे कागदोपत्री भासवून तिच्या १० लाखांचा अपहार करणाऱ्या व आपली चोरी पचली. आता ती कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा अविर्भावात वावरणाऱ्या जव्हारच्या आदिवासी प्रकल्प विभागाला आणि जव्हार, विक्रमगड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला व ठेकेदाराला लोकमतच्या वृत्ताने मोठी चपराक बसली. आपली चोरी पकडली जाऊ नये म्हणून घोडीच्या पाड्यातील आरक्षित जागेवर मंगल कार्यालय कमीतकमीत वेळात उभारायची स्पर्धाच जणू आता सुरु झाली आहे. तरी गुन्हे दाखल होणार आहेतच.दडपादडपीस जिल्हाधिकाऱ्यांचा विरोधअवघ्या आठवडाभरात इमारतीचे चारी बाजूच्या भिंती उभारणीचे काम पूर्ण झाले असून पत्रे एका रात्रीत चढविले जाणार असल्याचे कळते. या गैरकृत्यावर पांघरूण घालण्यास जिल्हाधिकारी तयार नसून प्रकल्प अधिकाऱ्यांनी जव्हार पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली असून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधिकारी दत्ता तोटेवाड यांनी लोकमतला दिली.मात्र दोषींवर कारवाई होऊ नये म्हणून भाजपचा एक गट कार्यरत असल्याची चर्चाही सर्वत्र सुरु आहे. अशा अनेक मंगलकार्यलया सह अनेक रस्ते, विहिरी इ, कामांचा संपूर्ण निधीच गिळंकृत करण्यात आल्याच्या तक्रारीतप्रथमदर्शनी तथ्य असल्याने पवईच्या आयआयटीकडून सर्व कामांचे आॅडिट होणार असल्याचे जिल्हाधिकारी बांगर यांनी लोकमतला सांगितले.