वाडा : वाडा पोलीस आणि जनता यांच्यात मित्रत्वाचे नाते असून संजय हजारे यांनी ते अधिक दृढ केले आहे. पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये प्रेम, आदर निर्माण झाला असून पोलिसांविषयी असलेल्या आस्थेचे प्रतीक म्हणूनच नागरिकांच्या श्रमदानाने ही पोलीस ठाण्याची भव्य वास्तू उभी राहिली असल्याचे प्रतिपादन कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांनी वाडा येथे केले.वाडा पोलीस ठाण्याच्या वतीने गुरुवार सायंकाळी ५ वा. च्या सुमारास पोलीस ठाण्याच्या आवारातील विस्तारीत नूतन इमारतीचे तसेच परेड मैदानावरील सलामी मंचाचे उद्घाटन बुरडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षिका शारदा राऊत यांनी संजय हजारे यांच्या कामाचे कौतुक केले. पोलीस पाटील कोंडू लोखंडे (पिक), अनंता पडवळे (कळंभई), पोलीसमित्र अनिल पाटील (कलमखांड), संजय लांडगे (वाडा), महिला दक्षता समिती सदस्या शालिनी गायकवाड, राजश्री तरसे यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी पोलीस पाटील मार्गदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. पोलीस पाटील, पोलीसमित्र, महिला दक्षता समिती यांना कायदेविषयक मार्गदर्शन अॅड. विनय भोतपराव यांनी केले.कार्यक्रमास पालघर जिल्हा पोलीस अधीक्षिका शारदा राऊत, अप्पर पोलीस आयुक्त भगवान यशोद, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक जगताप, डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर, जव्हारचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप जाधव, भिवंडी ग्रामीणचे आ. शांताराम मोरे, शिवसेवा ठाणे जिल्हा (ग्रा.) प्रमुख प्रकाश पाटील, पालघर जि.प. गटनेते निलेश गंधे, उपजिल्हाप्रमुख अरुण पाटील, तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, भाजपाचे तालुकाप्रमुख संदीप पवार, सभापती अरुण गौंड, उपसभापती नंदकुमार पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाप्रमुख पांडुरंग पठारे, काँग्रेसचे दिलीप पाटील, बहुजन विकास आघाडीचे अनंता भोईर, श्रमजीवी संघटनेचे विजय जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमास पोलीस पाटील, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.
‘नागरिकांच्या श्रमदानातून उभी राहिली पोलीस ठाण्याची इमारत’
By admin | Published: February 02, 2016 1:41 AM