पालघर:- तालुक्यातील नंडोरे (बसवत पाडा)येथील एका चिकूच्या वाडीमध्ये विजेच्या तारेचा शॉक लागून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या दोन जणांसोबत एक बैल ही मृत्युमुखी पडल्याने बसवत पाड्यातील ग्रामस्थांनी पालघर पोलिस ठाण्यात जाऊन दोशिविरोधत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
पालघर पूर्व येथील नंडोरे येथे रानडुकरांसाठी लावलेल्या जिवंत विजेच्या सापळ्याच्या संपर्कात आल्याने पडघे कळमपेडी येथे राहणाऱ्या सुजित शैलेश म्हसकर या 15 वर्षीय मुलाचा तर दिनेश बोस या 22 वर्षीय तरुणाचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला आहे. हे दोघेही काल रात्री खेकडे पकडण्यासाठी बसवत पाडा भागातील एका वाडी परिसरातून जात असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येते.बुधवारी बाहेर पडलेली मुले रात्री उशिराने घरी न आल्याने त्यांचा सर्वत्र शोध घेतला जात होता.मात्र सकाळी काही स्थानिकांना ही दोन तरुण मुले आणि काही अंतरावर एक बैल मरून पडल्याचे दिसून आले.
पालघर पोलीस व महावितरण विभागाचे अधिकारी,कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिल्यावर ह्या वाडीतील एका पोल वरून चोरट्या पद्धतीने हा विद्युत प्रवाह डुकरांना पकडण्याच्या लोखंडी तारांच्या सापळ्यात सोडण्यात आल्याचे दिसून आले.ह्या प्रकरणी अधिक तपास सुरू असून दोघाचे मृतदेह पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.