नालासोपारा : नालासोपारा येथील गुंडगिरी, महिलांवरील अन्याय मोडून काढा, असा आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला असून आपण त्यांच्या आदेशाचे पालन करणार आहोत. आता मला नवीन नालासोपारा-विरार तयार करायचे असून उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द आणि आदेश मी पाळणारच आणि येथील गुंडगिरी मोडून काढणार, असे प्रदीप शर्मा यांनी रविवारी नालासोपारा येथे सांगितले.पोलीस दलातून स्वेच्छानिवृत्ती घेऊन दोनच दिवसांपूर्वी प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर ते रविवारी प्रथमच विरार, नालासोपारा येथे आले होते. या वेळी मोटारसायकलवरून मोठी रॅली काढण्यात आली. नालासोपारा पश्चिमेकडील गॅलेक्सी हॉलमध्ये संध्याकाळी झालेल्या कार्यक्र मात त्यांचे स्वागत करण्यात आले.गेली ३६ वर्षे मी चोर-पोलीस खेळत असून यापुढे मी नालासोपारा शहरातच राहणार आहे, असेही शर्मा म्हणाले. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी दाऊदला मुंबई सोडायला लावली. तसेच जे नालासोपारा, विरारमध्ये दादागिरी करतील ते वसई सोडून जातील. याचबरोबर नालासोपारा, विरार शहरातील शिवसेनेच्या सर्व शाखा अद्ययावत करून त्यांची संख्या वाढवणार आहे.बाळासाहेबांची इच्छा नक्की पूर्ण करणार१९८५ मध्ये बाळासाहेब ठाकरे वसईला आले होते त्या वेळी त्यांनी येथे भगवा फडकला पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांची ही इच्छा आता नक्कीच पूर्ण होणार आहे. बाळासाहेबांचा हात सदैव माझ्या पाठीशी असून त्यांनी सामन्यात लिहिलेला तो लेख फ्रेम करून मी आजपर्यंत माझ्याजवळ ठेवला आहे.महानगरपालिका जिंकल्याशिवाय गप्प बसणार नाही - आमदार रवींद्र फाटकया वेळी शिवसेनेचे ठाण्यातील आ. रवींद्र फाटक हेदेखील उपस्थित होते. वसई-विरार तालुक्यातील दहशत लोकसभा निवडणुकीत संपवली असली तरी महानगरपालिकेवर जोपर्यंत भगवा फडकावून ताब्यात घेणार नाही तोपर्यंत गप्पबसणार नाही, असे ते या वेळी म्हणाले.
'वसई-विरारमधील गुंडगिरी मोडून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 5:40 AM