नालासोपारा (मंगेश कराळे) :- घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपीकडून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करत ५ गुन्ह्यांची उकल केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रविण बनगोसावी यांनी सोमवारी दिली आहे.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे परिसरात गेल्या काही महिन्यापासुन घरफोडी चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने सदर घटनांची वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेऊन आरोपीतांचा शोध घेऊन पायबंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सततच्या घडणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्याच्या अनुषंगाने २९ मे रोजी संध्याकाळच्या सुमारास गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस विरारफाटा परिसरात गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग करत फिरत होते. त्यावेळी घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी दुचाकीवरून प्रवास करीत असल्याचे त्यांना दिसला. त्याची दुचाकी पोलिसांनी शिताफीने अडवल्यावर त्याला संशय आल्याने तो त्याच्या ताब्यातील पिशवी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्याला जागेवरच पोलिसांनी पकडले. त्याच्या ताब्यातून गुन्हा करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य त्यात कटावणी, हँडग्लोव्हज, स्क्रू ड्रॉइव्हर, पोपटपाना, बॅटरी तसेच चोराचा मोबाईल मिळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले.
आरोपीकडे केलेल्या तपासात त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने ५ ठिकाणी घरफोडी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. चोरी केलेले सोन्याचे दागिने हे त्याने ओळखीच्या सोनाराकडे ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली. सोनाराकडून पोलिसांनी ४ लाख ७९ हजार ३४० रुपये किंमतीची ८ तोळे वजनाची चोरीच्या दागिन्यांची लगड हस्तगत करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीकडून मोबाईल, साहित्यही हस्तगत केले आहे. आरोपीकडून ५ गुन्ह्यांची उकल केली असून ३ गुन्ह्यात अटक करणे बाकी आहे. राहुल मुपनर असे या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा वालीव पोलिसांच्या कस्टडीत असून सदर गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा युनिट दोन करत आहे.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वसई युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, संजय नवले, पोलीस हवालदार रवींद्र पवार, प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदर, प्रशांतकुमार ठाकूर, अमोल कोरे, प्रतीक गोडगे, राजकुमार गायकवाड, अजित मैड, मसुब रामेश्वर केकान आणि सायबरचे संतोष चव्हाण यांनी केली आहे.