(मंगेश कराळे)
नालासोपारा: घरफोडी, चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून ११ गुन्ह्यांची उकल करून चोरी केलेल्या रोख रकमेपैकी ५ लाख १२ हजार ७०० रुपये हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी बुधवारी दिली आहे.
पेल्हार गावातील कोहिनूर बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या जैद नजीर शेरशिया (२३) यांच्या घरी २० सप्टेंबरला सकाळी आठच्या सुमारास चोरी झाली होती. चोरट्यांनी घराच्या दरवाजाची कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश करत कपाटातील १० लाख १५ हजाराची रोख रक्कम चोरी करून नेली होती. याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी तपास गुन्हेप्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांच्याकडे देऊन वेगवेगळे ५ पथके तयार करून आरोपींना अटक करून गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत आदेश केले होते.
गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी अमंलदार यांनी गुन्हयाचे घटनास्थळाच्या परिसरातील सुमारे ६० वेगवेगळया ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासुन आरोपीला निष्पन्न केले. आरोपी बाबतीत माहिती प्राप्त करून आरोपी हा भिवंडी येथे असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. आरोपी भिवंडी, अंबाडी पारोळ, नालासोपारा फाटा, शानबार हॉटेल, धानिवबाग असा पाठलाग करुन आरोपी चंद्रकांन्त रवि लोखंडे ऊर्फ चंदु (२६) यास शानबार हॉटेलच्या जवळ, धानिवबाग येथुन ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केल्यावर त्याचा गुन्हयात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यावर अटक केले आहे. आरोपीकडे तपास केल्यावर गुन्हयात चोरी केलेल्या रोख रक्कमेपैकी ५ लाख १२ हजार ७०० रुपये हस्तगत केले आहे. अटक आरोपीकडून पेल्हारचे ८, वालीवचे २, मांडवीचा १ असे ११ गुन्ह्यांची उकल केली आहे. अटक आरोपीकडून उघडकीस आलेल्या चोरी/घरफोडीच्या ११ गुन्हयामध्ये रोख रक्कम, सोने चांदीचे दागिने व मोबाईल असा ८ लाख ९९ हजार ५५० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्या विरुध्द वालीव व तुळींज पोलीस ठाण्यात पूर्वी १० गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पाटील, पोलीस निरीक्षक (प्रशासन) शिवानंद देवकर, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, रवि वानखेडे, संजय मासाळ, निखील मंडलिक, किरण आव्हाड, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, दिपक शेळके, नामदेव ढोणे, सोहेल शेख यांनी केली आहे.