वसई : प्रवाशांनी खचाखच भरलेली बस वेगाने घेऊन जात असताना चालकाचा बसवरचा ताबा सुटल्याने बसने महावितरणच्या एलटी मिनी पिलरला धडक दिली. चालक बस न थांबवताच निघून गेल्याचा प्रकार उजेडात आला आहे.हा अपघात सागरशेत येथे झाला. सकाळी प्रवाशांनी भरलेली वसई विरार परिहवनची बस (एमएच ४८ के ३७७) घेऊन चालक रेल्वे स्टेशनकडे निघाला होता. बस भरधाव वेगात असल्याने चालकाचा ताबा सुटून ती सागरशेत येथील पिलरला जाऊ़न धडकली. सुदैवाने विद्युत वाहक पिलरमधील वायरचा स्पर्श बसला झाला नाही. अन्यथा अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकला असता. हा अपघात झाल्यानंतर चालकाने पोलीस ठाण्यात तक्रार देणे बंधनकारक असताना चालक पुन्हा सुसाट वेगाने निघून गेल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.यापूर्वी १२ सप्टेंबर २०१६ रोजी मद्यपान करून महापालिकेची बोलेरो गाडी घेऊन निघालेल्या हर्षद पाटील या चालकाने सागरशेत पंपाजवळील महावितरणच्या विद्युत पोलला धडक दिली होती. त्यावेळी महावितरणचे १६ हजार ६५० रुपये नुकसान झाले होते. या दोन्ही चालकांवर त्वरीत गुन्हा दाखल करून वाहनाचा परवाना व वाहन चालकाचा परवाना रद्द करून त्यांना निलंबित करण्यात यावे. तसेच नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी गुंजाळकर यांनी केली आहे.परिवहनच्या अ़नेक बसेस भंगार झाल्या आहेत. त्यांची देखभाल-दुरुस्ती नीट केली जात नसल्याने अनेक बसेस रस्त्यावरच बंद पडत असतात. त्यातच आता नंबरप्लेट नसलेल्या बसेसही रस्त्यावर धावत असतात. अनेक चालक ६० वर्षांहून अधिक वयोगटातील आहेत.
परिवहन बसची पिलरला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 12:26 AM