लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड: लाखो रुपयांचे कपडे विकत घेऊन २० रुपये देऊन महिलेची फसवणूक करण्यात आली. ही घटना मीरा रोड परिसरात घडली. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मीरा रोडच्या जरीमरी तलावाजवळ दयाशंकर त्रिपाठी राज इस्टेटमध्ये पुष्पा अरोरा पतीसह राहते. महिलांच्या कपड्यांची ३ दुकाने आहेत.
करिश्मा अरोरा हिच्या घरी आली आणि तिने १ लाख ११ हजार रुपयांचे महिलांचे कपडे खरेदी केले. ऑनलाइन पैसे देण्यापूर्वी तिने अरोराच्या बँक खात्यावर २० रुपये पाठवले. करिश्माने एनईएफटीद्वारे १ लाख १६ हजार ७०० रुपये बँक खात्यात पाठवल्याचा संदेश अरोरा हिला दाखविला. तीन-चार तासांत पैसे तुमच्या खात्यात जमा होतील, असे सांगतानाच खात्री म्हणून एका बँकेचा धनादेश देऊन खरेदी केलेले कपडे घेऊन ती निघून गेली.
पैसे देण्यास टाळाटाळ■ सायंकाळी करिश्मा हिने अरोरा यांना कॉल करून तुमच्या खात्यात पैसे आले का? अशी विचारणा केला असता पैसे आले नसल्याचे त्यांनी सांगितले. पैसे आले नाहीतर माझ्या कर्मचाऱ्याला रोख रक्कम घेऊन पाठवून देईन, असे करिश्मा हिने सांगितले.■ परंतु बँकेत वा रोखद्वारे कपड्यांचे पैसे न मिळाल्याने आणि करिश्मा ही पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याने अरोरा यांनी ११२ वर कॉल करून पोलिस मदत मागितली.■ फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने अरोरा यांनी काशीगाव पोलिस ठाण्यात फिर्याद देत गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक तपास करत आहेत.