डहाणू - लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना वाघासारखी लढली. त्यामध्ये शिवसेनेचा थोड्या फरकाने पराभव झाला असला तरी मतांची आकडेवारी पाहता शिवसेनाच विजयी झाली. सच्चाईने निवडून येणार नसल्याने भाजपने साम,दाम, दंड, भेद चा वापर करुन निवडणूक जिंकली. भाजपने शिवसेनेचा धसका घेतला आहे. अशी टीका पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे मंगळवारी केली.कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संजय मोरे यांच्या प्रचारसभेसाठी ते आले होते. यावेळी पदवीधरांचे विविध प्रश्न शिवसेनाच सोडवणार असल्याने शिवसेना उमेदवार संजय मोरे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेला प्रचंड मतदान झाले असून डहाणूत शिवसेनेची मते ७ हजारावरुन ३८ हजारावर गेली आहेत. कोकण पदवीधर निवडणुकीत शिवसेनेला भरघोस मतदान करा असे आवाहन त्यांनी केले. संपर्कप्रमुख व आ. रविंद्र फाटक, आ. अमित घोडा, लोकसभा संपर्क प्रमुख केतन पाटील, श्रीनिवास वनगा, उपजिल्हाप्रमुख संतोष शेट्टी. पदवीधर निवडणुकीचे सेनेचे उमेदवार संजय मोरे तालुकाप्रमुख संतोष वझे, शहर अध्यक्ष संजय कांबळे, माजी नगरसेवक संजय पाटील, तुषार पाटील यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
पोटनिवडणुकीत शिवसेना वाघासारखी लढली-शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 4:04 AM