नालासोपारा : कुणी घर देता का घर? एका तुफानाला कुणी घर देता का? नटसंम्राट चित्रपटातील या संवादाने भल्याभल्यांच्या काळजाची घालमेल झाली. असाच काहिसा प्रकार अर्नाळा गावातील प्रभाकर फुल्या (५०) या दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत घडला आहे. गावातील त्यांचे असलेले पिढीजात घरच हरवले असून याबाबत त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करत, माझे हरवलेले घर शोधून देण्याबाबत विनंती केली आहे. आपण दरवर्षी घरपटटी भरत असताना माझे घर हरवले कसे? असा प्रश्न त्यांनी ग्रामपंचायतीला विचारला आहे.अर्नाळा गावातील प्रभाकर फुल्या यांचे घर क्र मांक ७१३/अ हे अर्नाळा ग्रामपंचायत हद्दीत आहे. याबाबतची नोंद ग्रामपंचायत कार्यालयातील दप्तरी आहे. या घराची मालमत्ता कर (घरपट्टी) प्रभाकर फुल्या दरवर्षी न चुकता ग्रामपंचायतीकडे करीत आले आहेत. मात्र, मध्यंतरी त्यांच्या पत्नीचे देहावसान झाल्यानंतर ते दुसऱ्या ठिकाणी रहायला गेले होते. मात्र आठवडा पंधरा दिवसांनी न चुकता ते आपल्या अर्नाळ्याच्या घरी येत असत. त्यांच्या भाऊ एकनाथ याने घराचे रिनिव्हेशन करायचे आहे असे सांगून प्रभाकर यांच्याकडून साडेतीन लाख रूपये घेतले होते. नवीन घर बांधल्यानंतरही ते नियमित आपल्या घरात येत असत.मात्र ६ मे २०१८ रोजी ते आपल्या घरी आले असताना त्यांची बहिण व भाच्यांनी हे घर आमचे असून याची घरपट्टी आमच्या नावावर असल्याचे सांगत त्यांना घरातून हाकलून दिले. आपले उभे आयुष्य अर्नाळ्यातील आपल्या पिढीजात घरात घालवलेल्या पांडुरंग फुल्या यांना आपले घर आता आपले नसल्याचे समजताच मोठा धक्का बसला होता. हताश झालेल्या फुल्या यांनी त्यानंतर ग्रामपंचायतीत धाव घेत ग्रामविकास अधिकारी पंकज संख्ये यांची भेट घेत त्यांना विषयाचे गांभीर्य सांगितले. मात्र ग्रामविकास अधिकारी पंकज संख्ये यांनी चर्चेसाठी फुल्या यांच्या कुटुंबातील दोन व्यक्तींना बोलवण्यासाठी नोटीस काढून आपले हात झटकले. त्यानंतर गेल्या चार महिन्यात कोणतेही उत्तर मिळले नाही.त्यातच त्याच्या घराची ती घरपट्टी त्यांच्या भावाच्या नावावर फिरवण्यात आली असल्याचा प्रकर घडला आहे. याबाबत अर्नाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता बाळशी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. मात्र ग्रामविकास अधिकारी पंकज संख्ये यांच्याशी संपर्क साधला असता मला याबाबत काहीही माहिती नाही. चौकशी करून कळवतो असे सांगत त्यांनी हात झटकले.शासनाच्या दिव्यांग योजनांकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्षया ग्रामपंचायतीकडून दिव्यांग व अपंगांसाठी शासनाच्या विविध योजना राबविण्याकडे सप्शेल दुर्लक्ष होताना दिसत आहे. सध्या भाजपाची सत्ता असणाºया या पंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे गेल्या आर्थिक वर्षातील अपंग कल्याणासाठीचा तीन टक्के निधी खर्च न झाल्याने जिल्हा कोषागारमध्ये जमा करावा लागला होता.याबाबत गावातील दिव्यांगांचे प्रतिनिधित्व करणाºया अपंग कल्याणकारी संस्थेने अर्नाळा ग्रामपंचायतीशी सातत्याने पाठपुरावा केला होता. अपंगांच्या न्याय हक्कासाठी अपंग कल्याणकारी संस्थेने अर्नाळा ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात ग्रामपंचायत आवारात ३१ मार्च रोजी उपोषण आणि धरणे आंदोलनही केले होते. मात्र, आपल्या न्याय मागण्यांसाठी लढणाºया या संस्थेकडे दुर्लक्ष झाले.एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांगांना सन्मानाने जीवन जगता यावा यासाठी केंद्र सरकारच्या विविध योजना राबवण्यावर भर दिला आहे.मात्र भाजपाची सत्ता असलेल्या अर्नाळा ग्रामपंचायतीची अपंगाबाबत सावत्र वागणूक दिव्यांगांच्या सबलीकरणात मोठा अडथळा बनली आहे. प्रभाकर फुल्या अजूनही आपले घर ग्रामपंचायत शोधून देईल या आशेवर ग्रामपंचायतीच्या रोज चकरा मारत आहेत.
माझे घर हरवले आहे कुणी शोधून देता का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 9:46 PM