वसई : प्रदूषण, धूम्रपान, गुटखा, अतिमद्यपान, लठ्ठपणा, तळलेल्या पदार्थांचे अतिसेवन, आदी कॅन्सर बाधा होण्याची शक्यता असलेली काही कारणे आहेत. प्राथमिक टप्प्यावर कॅन्सर कळत नाही. म्हणून प्रतिबंधन हाच त्यावर खरा उपाय आहे. तसेच तपासणीत वेहीच निष्पन्न झाल्यास उपचार करता येतो. असे कॅम्प भरवणे साधे काम नाही. पण निर्भय जनमंचने १०० कॅम्प भरवले याचे कौतुक आहे, असे प्रतिपादन पालघर येथील सुप्रसिध्द स्त्रीरोग तज्ज्ञ आणि पुरोगामी विचारांचे डॉ.विलास पोसम यांनी कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल, नंदाखाल येथे निर्भय जनमंचच्या १०० व्या कॅन्सर चिकित्सा शिबीराच्या उदघाटन सोहळ्यात केले. अध्यक्षस्थानी १९९० च्या पहिल्या कॅम्पच्या उदघाटक सि.ओल्गा परेरा होत्या.इंडियन कॅन्सर सोसायटीच्या सौजन्याने निर्भय जनमंचने आतापर्यंत १०० कॅन्सर चिकित्सा शिबिरे भरवली. त्यात सुमारे ९ हजार स्त्री-पुरुषांची तपासणी झाली. त्यात अनेक संशयित केसेस सापडल्या. त्यांना त्वरीत उपचार मिळाल्याने या सर्वाना वाचवता आले. आता स्त्रीयांची मॅमोग्राफी, पॅपस्मियर, संपूर्ण शरीराची तपासणी, स्त्री-पुरुषांची नाक-कान-घसा तपासणी, एक्स-रे, ल्युकेमियाची रक्तचाचणी, पुरुषांचीअंतर्गत तपासणी अशा विविध तपासण्या या शिबीरात करण्यात येतात. नंदाखाल येथील कार्मेल कॉन्व्हेट हायस्कूलच्या प्राचार्या सि.सुषमा यांनी शाळेचे आवार आणि तळमजल्यावरील सर्व वर्ग यासाठी उपलब्ध करुन दिले होते. या शिबीरात सामवेदी ब्राह्मण समाजाच्या ११८ स्त्री-पुरुषांची तपासणी करण्यात आली. याआधी वाघोली, कोफराड येथेही त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. (प्रतिनिधी)
वसईमध्ये कॅन्सर चिकित्सा शिबीर
By admin | Published: October 06, 2016 2:19 AM