विक्रमगड - पालघर व ठाणे जिल्ह्यातील गरीब शेतकऱ्यांच्या उपवर मूला- मुलींचे विवाह लावण्यासाठी धर्मादाय संस्थांच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील विक्र मगड येथे रविवारी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. धर्मदाय संस्था सामुदायिक विवाह सोहळा पालघर शुभमंगल समिती व सार्वजनीक न्यास नोंदणी कार्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्ह्यातील पहिल्या सामूहिक विवाह सोहळ्याचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी ३९ जोडप्यांना लग्नाच्या बेडीत अडकवून भावी जिवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.हे आयोजन विक्रमगड ग्रामीण रूग्णालयाजवळील मैदानात करण्यात आले होते. यासाठी विरार येथील श्री जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट व वज्रेश्वरी योगीनी देवी ट्रस्ट यांनी पूढाकार घेतला होता.येत्या १९ एप्रिलला जुचंद्र, ११ मेला कल्याण व १२ मेला जीवदानी येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संगिता वनकोरे (धर्मदाय उपआयुक्त ठाणे), काशीनाथ पाटील (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ठाणे), प्रदिप तेंडोलकर (जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट,विरार कार्यवाह), दत्ता गायकवाड (आदिवासी विकास प्रकल्प प्रतिनिधी), अविनाश राऊत (वज्रेश्वरी योगीनी संस्थान अध्यक्ष), अशोक उंबरे (धर्मादाय विभाग ठाणे, निरिक्षक), अपूर्णा रावळ (सहाय्यक धर्मादाय विभाग ठाणे )आदी मान्यवर व मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.श्री जीवदानीदेवी ट्रस्टकडून दोन हजार साड्यांचे वाटपदुपारी १२ च्या मूहूर्तावर सामुदायिक विवाह लावण्यात आले. यावेळी वधूंना साडी-चोळी, सोन्याचे मंगळसुत्र व आंदण म्हणून हंडा, कळशी, ताट-वाटी आदी भांडी देण्यात आली. वरालाही लग्नासाठी कपडे देण्यात आले. श्री जीवदानी देवी ट्रस्टमार्फत लग्नात उपस्थित दोन हजार महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी एक ट्रस्ट स्थापन करण्यात आला असून श्री जीवदानी देवी मंदिर ट्रस्टकडून तीन लाख, श्री वज्रेश्वरी योगीनी देवी ट्रस्टमार्फत दोन लाख तर इतर सेवाभावी ट्रस्टमार्फत दीड लाखांचा निधी जमा झाला असल्याची माहिती जीवदानी देवी मंदिर ट्रस्टचे कार्यवाह प्रदिप तेंडोलकर यांनी दिली.
विक्रमगडमध्ये शेतकरी कुटुंबातील ३९ जोडप्यांचे शुभ लग्न सावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 6:27 AM