लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - होर्डिंग वर जाहिरात लावण्यासाठी चढलेल्या कामगाराचा खाली पडून मृत्यू झाल्या प्रकरणी काशीमीरा पोलिसांनी जाहिरात ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे . तर या घटनेने शहरातील नियमबाह्य व धोकादायक होर्डिंगचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
काशीमीरा महामार्गावर दारास ढाबा जवळ असलेल्या भारत कंपाउंड मधील मुबारक हुसेन टिंबर मार्ट या ठिकाणी जाहिरातीसाठी गाळ्याच्या आतून सुमारे ७० फूट उंच होर्डिंग उभारण्यात आले आहे . आशिष बोराणा यांच्या एंगेज आऊट डोअर मिडीया ह्या जाहिरात कंपनीचे होर्डिंग असून त्यावर जाहिरात लावण्याचे काम जय आर्ट कंपनीस दिलेले आहे . या होर्डिंग वर जाहिरात लावण्याचे काम रामप्रीत प्रसाद हरिजन (४८) , विकास सहानी व शिवधर बिंद हे करत असताना रामप्रीत ह्यांचा वरून हात सटकून ते सुमारे ३५ फुटांवरून खाली गाळ्याच्या पत्र्यावर व नंतर पत्रा तुटून खाली जमिनीवर पडले . गंभीर जखमी रामप्रीत यांना नजीकच्या रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले .
या प्रकरणी इतक्या उंचावर काम करत असताना देखील कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेण्यास व आवश्यक सुरक्षा साधने देण्यास कसूर केल्या ने रामप्रीत यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला म्हणून जय आर्ट कंपनीचा मालक जयबिर बच्चा सिंग,(४५) रा. नरेश एम्पायर, इंद्रलोक, भाईंदर पुर्व याच्यावर पोलिसांनी १६ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला आहे .
जाहिरात फलक नियंत्रण अधिनियम नुसार रस्ता - पदपथ वर होर्डिंग लावता येत नाही . वाहतुकीला अडथळा होईल पासून सीआरझेड आदी अनेक नियम निर्देश सदर अधिनियमात दिले आहेत . २० बाय ४० फुटा पेक्षा जास्त आकाराचे होर्डिंग उभारता येत नाही . तसे असताना शहरात त्याचे सर्रास उल्लंघन करून होर्डिंग उभारण्यात आले आहेत . काजूपाडा - चेणे भागातील घोडबंदर मार्गावर तीव्र अपघाती वळणावर धोकादायक आणि नियमबाह्य होर्डिंग ना पालिकेनेच संरक्षण दिले असून वाहतूक पोलिसांनी पत्र देऊन देखील कारवाई केलेली नाही . उच्च न्यायालयाने देखील होर्डिंग दुर्घटना बाबत आदेश दिले असले तरी त्याचे पालन सुद्धा पालिका करत नाही . काही महिन्या पूर्वीच्या वादळात शहरातील मुख्य रस्त्यावरची होर्डिंग पडण्याच्या दुर्घटना घडून देखील पालिका मात्र आणखी अपघात व मनुष्य हानीची प्रतीक्षा करत आहे का ? असे आरोप होत आहेत .