- राजू काळेभार्इंदर, दि. 17 - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयात अपुऱ्या रुग्णसेवेसह उपचारात हलगर्जीपणा झाल्याने वैशाली डामरे (१७) या मुलीचा मृत्यु झाल्याचा आरोपामुळे आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी चौकशी समिती नियुक्त केली. समितीच्या अहवालात त्या मुलीचा मृत्यु प्रकरणी कर्तव्यावर असलेल्या डॉ. स्रेहल नरवडे यांच्यावर हलगर्जीचा ठपका ठेवण्यात आला आहे.या अहवालात घटनेचा संपुर्ण तपशील नमुद करण्यात आला असुन तो लवकरच आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे. त्याची शहानिशा करुन आयुक्त त्यावर आपला निर्णय जाहिर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गणेशोत्सवासाठी मालेगावहुन भार्इंदर येथील डॉ. आंबेडकर नगर येथे राहण्यास आलेल्या वैशालीला १२ सप्टेंबरला सकाळी ७.३० वा. च्या सुमारास अस्वस्थ वाटु लागले. उपचारासाठी ती लगतच्याच जोशी रुग्णालयात गेली. तेथे तीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तीला रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला ओपीडी (बाह्य रुग्ण विभाग) मधील डॉक्टरांनी दिला. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तेथील नर्सकडुन तीच्यावर उपचार सुरु करण्यात आले. काही तासानंतर तीला श्वास घेण्यात अडचण होऊ लागल्याने तीची वैद्यकीय तपासणी करुन तीला त्वरीत सुसज्ज रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असतानाही त्याकडे गांभीर्य दाखविण्यात आले नाही. दरम्यान तीच्या तपासणीकडे देखील दुर्लक्ष करण्यात आल्याने सायंकाळी तीची प्रकृती खालावली. त्यालाही तेथील कर्तव्यावर असलेल्या डॉ. नरवडे यांनी नजरेआड केले. तत्पुर्वी तीच्या पालकांनी तीच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल डॉ. नरवडे यांना दाखविला. त्यात तीच्या लघवीतुन रक्ताचा स्त्राव होत असुन रक्तबिंबीका (प्लेटलेटस्) अत्यंत कमी असल्याचे नुमद असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. साधारण व्यक्तीचे प्लेटलेटस् दिड लाखापर्यंत असणे आवश्यक असते. वैशालीचे प्लेटलेटस् मात्र सुमारे ३६ हजारावर आले होते. अशावेळी रुग्णालयात अतिदक्षता विभागासह अदयावत सुविधा नसल्याने तीला सुसज्ज रुग्णालयात हलविणे अत्यावश्यक असतानाही त्यावर गांभीर्य दाखविले नाही. श्वसनास त्रास होत असताना वैशाली मोकळ्या हवेत जाण्याची सतत मागणी करीत असताना त्याची माहिती डॉ. नरवडे यांना तेथील नर्सने फोनद्वारे देऊनही त्या वॉर्डमध्ये गेल्या नाहीत. अखेर ती बेशुद्ध पडल्यानंतर तीला सुरुवातीला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. परंतु, तेथे पोहोचण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याने तीच्या नातेवाईकांनी तीला लगतच्या कस्तुरी मेडीकेअर या खाजगी रुग्णालयात हलविले. तेथे तीला मृत घोषित केल्यानंतर पुन्हा तीला जोशी रुग्णालयात आणण्यात आले. प्रकरण अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाल्याने डॉ. नरवडे यांनी प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. निखाते यांना पाचारण केले. सायंकाळी ७ वाजता घडलेल्या उपचार नाट्यानंतर रात्री ९ वाजताच्या सुमारास डॉ. निखाते रुग्णालयात दाखल झाले. त्यांना घटनेची माहिती नसल्याने त्यांनी मृत वैशालीवर साधारण रुग्णाप्रमाणे उपचार करण्याचा प्रयत्न केल्याचे चौकशी अहवालात नमुद करण्यात आले असुन त्यावर आयुक्त कोणता निर्णय घेणार, हे पहावे लागणार आहे. एका डॉक्टरने सलग २४ तासांपेक्षा अधिक ड्युटी करु नये, असा साधारण वैद्यकीय नियम गृहित धरला जात असतानाही डॉ. नरवडे या सलग २४ तासांहुन अधिक वेळ रुग्णालयात ड्युटीवर हजर असल्याचे सुत्राकडुन सांगण्यात आले. याबाबत मीरा-भाईंदर महापालीकेचे प्रभारी मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश जाधव यांनी सांगितले कि, चौकशी अहवाल आयुक्तांना सादर केल्यानंतर तेच त्यावर निर्णय घेतील. त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार त्यांना आहे.
त्या मुलीच्या मृत्युप्रकरणी डॉ. स्रेहल नरवडेवर हलगर्जीपणाचा ठपका; चौकशी समितीने अहवालात नमुद केला घटनाक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 7:15 PM