भार्इंदर : भार्इंदर येथील आठवडाबाजार नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानालगत स्थलांतर करण्याच्या पालिकेच्या इराद्याला स्थानिक पोलिसांनी मनाई केली. येथील मार्गावरून उत्तनच्या ज्युडीशियल अकादमी तसेच केशवसृष्टी येथे ये-जा करणाऱ्या व्हीआयपींना त्याचा अडसर तसेच धोका उद्भवण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.पालिकेकडून बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याची ओरड लोकप्रतिनिधींकडून होऊ लागल्यानंतर प्रशासनाने त्याला नुकतीच सुरुवात केली आहे. ती सुरू झाल्यानंतर प्रशासनाने मीरा रोड येथील सोमवारचा आठवडा बाजारही बंद करण्याची कार्यवाही सुरू करून भार्इंदर येथील रविवारचा आठवडाबाजार परिसरातीलच नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानालगत स्थलांतरित करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला या बाजारातील भाजी-फळे व खाद्यपदार्थ विक्रेत्यांखेरीज इतर विक्रेत्यांना स्थलांतरित करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसा ठराव तत्कालीन महासभेत मंजूर केल्याने त्यानुसार कार्यवाहीला सुरुवात केली आहे. परंतु, यातील स्थलांतराच्या ठिकाणी असलेल्या रस्त्यावरील अनेक ठिकाणे अपघाताची आहेत. याच रस्त्यावरून दिवाणी ते सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश उत्तन-गोराई मार्गावर असलेल्या महाराष्ट्र स्टेट ज्युडिशियल अॅकॅडमीत सतत येत असतात. उत्तनमध्येच असलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, केशवसृष्टीत भाजपा मंत्र्यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांचीही सतत रेलचेल असते. यात सध्या वाढ झाली असून रविवारी मात्र व्हीआयपींच्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. शिवाय येथील भाटेबंदर, पाली बीचवर रविवारच्या दिवशी येणाऱ्या पर्यटकांची वाहनेसुद्धा याच रस्त्यावरून धावत असल्याने रविवारच्या दिवशी तेथे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. अगोदरच येथील व्हीआयपींच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांना या रस्त्यावर विशेष बंदोबस्त ठेवावा लागत असताना रविवारचा आठवडाबाजार येथे स्थलांतरित केल्यास तेथे गर्दी वाढून व्हीआयपींना अडसर तसेच त्यांना धोका निर्माण होण्याचा संभव असल्याचे भार्इंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भास्कर पुकळे यांनी सांगितले. हे स्थलांतर रोखण्याबाबत आयुक्त तसेच महापौरांना विनंती केल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
भार्इंदरच्या आठवडाबाजार स्थलांतराला मनाई
By admin | Published: February 02, 2016 1:40 AM