मीरारोड - निवडणूक आयोगाच्या निर्देशा नुसार लोकसभा निवडणुकीच्या मतदान केंद्रांवर मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील मतदारांनी मतदान केंद्रावर येताना सोबत मोबाईल आणू नये व आयोगाच्या निर्णयाचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मतदान केंद्रात तसेच मतदान प्रक्रियेच्या ठिकाणी छायाचित्र काढण्यास बंदी आहे . त्याच प्रमाणे मोबाईल नेण्यास सुद्धा मनाई करण्यात आली आहे. मतदान केंद्रात मोबाईल नेल्यास आतील छायाचित्र काढण्याची वा छायाचित्रण करण्याची भीती आयोगाला वाटते. या शिवाय मोबाईल च्या गैरवापरा मुळे मतदान प्रक्रियेत व्यत्यय येऊ शकतो. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी कारणे मोबाईल बंदी मागे दिली जात आहेत.
वास्तविक मोबाईल हा दैनंदिन वापरातील महत्वाचा भाग बनला आहे . शिवाय हल्ली मतदान पत्रिका , मतदान केंद्र आदींची माहिती सुद्धा मोबाईलवर दिली जाते. अनेक मतदार तर कामा निमित्त जाताना मतदान करून जातात. मग त्यांनी त्यांचे सामान आणि मोबाईल ठेवायचे तरी कुठे? असे प्रश्न केले जातात. मतदानासाठी बाहेर पडताना एक तर घरीच मोबाईल ठेवावा लागणार आह. कारण वाहन वगैरे सोबत असले तरी त्यात मोबाईल ठेवणे सुद्धा चोरीला जाण्याची भीती असते . आपल्या परिचितांना शोधणे वा आवश्यकता असल्यास संपर्क साधण्यास मोबाईल सोबत असणे बहुतांशी लोकांना गरजेचे वाटते.
परंतु निवडणूक आयोगानेच मोबाईल आणण्यास मनाई केलेली असल्याने त्याचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी पोलिसांची असल्याचे आयुक्तालयातील पोलीस सूत्रांनी सांगितले . मतदानासाठी आलेल्या मतदाराचा मोबाईल ठेवण्याची पर्यायी व्यवस्था करणे देखील अशक्य व अवघड असल्याचे सांगितले जाते . मोबाईल सोबत नसल्याने बहुतांश मतदारांची मात्र अडचण तसेच गैरसोय होणार आहे.
मीरा भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी देखील भाईंदर पोलीस ठाण्यातील पत्रकार परिषदेत , मतदारांनी मतदान केंद्रांवर मोबाईल सोबत आणू नये असे आवाहन केले आहे.