- लोकमत न्यूज नेटवर्क
बोर्डी : डहाणू महसूल विभागामार्फत विविध दाखल्यांचे वितरण धीम्यागतीने सुरू आहे. दरम्यान, दाखले मिळविण्यात अडचणीचा सामना करावा लागत असल्याने शासनाकडून दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सवलतींपासून वंचिव राहण्याची भीती विद्याथी-पालकांना सतावू लागली आहे. अवैध रेती चोरी, धान्य आणि दाखले वाटप अशा नागरिकांच्या नानाविविध समस्याची सोडवणूक करण्यात डहाणू महसूल विभागाला अपयश आल्याचा आरोप करीत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ८ ते १० जून या कालावधीत महसूल विभगामार्फत दाखले वाटपाचा कार्यक्र म तालुक्यातील कासा, चिंचणी, नरेशवाडी, वाणगाव आणि पारनाका येथील शाळांमध्ये घेण्यात आला. मात्र, या कार्यक्र माची माहिती सामन्यांपर्यंत पोहचवण्यात अपयश आल्याने त्यास तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. १२ वी आणि १० वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शैक्षणिक प्रवेशाकरिता दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थी पालकांची धावपळ सुरू झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील सेतू आणि महाईसेवा केंद्राप्रमाणेच फोर्ट येथील महसूल कार्यालयासमोर रांगा दृष्टीस पडत आहेत. खराब नेटवर्कमुळे कर्मचारी हतबलदाखल्याकरिता आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज जमा केल्यानंतर ठराविक दिवसांची कालमर्यादा उलटूनही दाखले हाती लागत नाही. संबधित विभागामार्फत महाआॅनलाइनचे सर्वर डाउन होणे आणि इंटरनेट सेवा स्लो असल्याची सबब पुढे केली जाते असे नागरिकांचे म्हणणे आहे. या बाबतची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता खराब नेटवर्कमुळे दाखल्याच्या ई-नोंदी तसेच डिजटल साईन करून घेण्यात अडचणी येत असल्याची कर्मचाऱ्यांची व्यथा पुढे आली आहे. पदवी परीक्षांचा निकाल जाहीर होण्याआधी सदर विभागाने नव्याने दाखले वाटपाचा कार्यक्र म घेण्यात यावा अशी मागणी विद्यार्थी-पालकांकडून करण्यात येत आहे.