वाडा : वाडा पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शेळके या बुधवारी (दि.12) पालघर येथील सर्वसाधारण सभा आटोपून सायंकाळच्या सुमारास वाड्याच्या दिशेने येत असतांना वाघोबा खिंडीत एका ट्रकने त्यांच्या वाहनाला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातातून त्या चालकासह बालंबाल बचावल्या आहेत.
पालघर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. १२) पालघर येथे असल्याने त्या शासकीय वाहनातून या सभेसाठी गेल्या होत्या. सभा आटोपल्यानंतर त्या याच वाहनाने परतताना वाघोबा खिंडीत एका ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने टृक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून तो त्यांच्या वाहनावर आदळल्याने अपघात झाला. मात्र यात सुदैवाने चालक व सभापती यांना काहीही दुखापत झाली नाही.दरम्यान, वाडा पंचायत समितीसाठी चार वाहने असून एक गटविकास अधिकारी यांच्यासाठी दुसरे पाणी पुरवठा विभागासाठी तिसरे महिला बाल कल्याण विभागासाठी तर चौथे सभापती यांच्यासाठी आहेत. मात्र या चार वाहनांसाठी तीनच वाहन चालक असल्याने सभापतीच्या वाहनांकरता वाहन चालक नसल्याने गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे यांनी पंचायत समितीतील शिपाई पदावर कार्यरत असलेले संतोष यांना वाहनचालक म्हणून जाण्याचे आदेश दिले. मात्र सभापती शेळके यांनी अपघातानंतर गटविकास अधिकारी यांनी अधिकृत वाहनचालक न दिल्याने नाराजी व्यक्त केली आहे.गेल्या जानेवारीपासून माझ्या गाडीसाठी वाहनचालक नसल्याने वारंवार या बाबत मी गटविकास अधिकाऱ्यांकडे चालकाची मागणी करीत आहे. मात्र जिल्हा परिषदेकडे चालका साठी प्रस्ताव पाठवल्याचे सांगितले जात आहे.-अश्विनी शेळके, सभापती,पंचायत समिती वाडाचार वाहने असून त्यासाठी तीनच चालक आहेत. एका पदासाठी वृत्तपत्रामध्ये जाहिरात दिली आहे. मात्र मागील महिन्यात आचारसंहिता लागल्याने ही प्रक्रि या खोळंबली आहे.ती आता लवकरच पूर्ण केली जाईल.-राजलक्ष्मी येरपुडे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती वाडा