पंकज राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : पालघर तालुक्याच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये एकूण ३४ गणांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे ४ दिवस उरले असल्याने उमेदवारांच्या मुलाखती आणि उमेदवार निश्चित करणे या प्रक्रियेला वेग आला आहे. अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच पक्षांतील इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू असून इच्छुकांच्या गर्दीने पक्ष कार्यालये फुललेली दिसत आहेत, तर सक्षम व योग्य उमेदवार निवडीचे आव्हान सर्वच पक्षश्रेष्ठींपुढे निर्माण झाले आहे.
पालघर तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून सलग दोन दशके सेनेची सत्ता पालघर पंचायत समितीवर आहे. तालुक्याच्या शहरी व सागरी भागावर सेनेची चांगली तर बहुजन विकास आघाडीची डोंगरी भागावर बऱ्यापैकी पकड आहे. या निवडणुकीमध्ये अनेक विद्यमान सदस्यांच्या गणावरील नव्याने पडलेल्या आरक्षणामुळे त्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. आता त्यांच्याच पक्षातील उमेदवारांचा प्रचार करून निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.
पालघर जिल्ह्याच्या नवनिर्मितीनंतर पालघर पंचायत समितीच्या ३४ गणांसाठी २८ जानेवारी २०१५ रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये कुठलाही राजकीय पक्ष व संघटनांमध्ये युती व आघाडी झाली नव्हती. सर्व प्रमुख पक्ष आणि संघटनांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत शिवसेनेने ३३ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केले होते. त्यापैकी १९ जागांवर विजय मिळवला होता, तर भाजप २४ पैकी ४, काँग्रेस १७ पैकी ०, राष्ट्रवादी काँग्रेस ७ पैकी ०, तर बहुजन विकास आघाडीने २८ उमेदवार उभे करून १० उमेदवारांना निवडून आणले होते, तर १ अपक्ष उमेदवार निवडून आला होता. आता बदललेल्या समीकरणात कोणत्या पक्षाला फायदा होईल, याचीही चर्चा रंगू लागली आहे.राज्यातील समीकरणाची पुनरावृत्ती जिल्ह्यातही?अनपेक्षित जाहीर झालेल्या निवडणुकीमुळे सर्वच पक्ष, संघटना तसेच इच्छुक उमेदवारांची प्रचंड धावपळ सुरू असून या घडीला फक्त उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला प्राधान्य देण्यात येत आहे. राज्यात शिवसेना-भाजपची मागील २५ वर्षांपासूनची युती तुटून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांची महाआघाडी राज्याच्या सत्तेत आली असून आता तशीच आघाडी राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये होण्याच्या शक्यतेमुळे राज्यातील सत्तासमीकरणाची पुनरावृत्ती पालघर जिल्ह्यातही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असले तरी नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम मुदत २३ डिसेंबर असून ७ जानेवारीला निवडणूक असल्याने हा अवधी खूपच कमी आहे. त्यामुळे आघाडी व अंतिम उमेदवारांबाबत निर्णय जलद गतीने घ्यावा लागणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने १७ डिसेंबरमध्ये दिलेल्या सूचनांनुसार व अधिनियमातील तरतुदीनुसार पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय निर्वाचन गणाचे नाव नामनिर्देशन पत्र सादर करणे, नामनिर्देशन पत्रांची छाननी, नामनिर्देशन पत्र सादर करण्याची व त्याची छाननी करण्याचे ठिकाण मतदान व मतमोजणीची तारीख, वेळ व मतमोजणीचे ठिकाण याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार सोमवार २३ डिसेंबर ही नामनिर्देशपत्र सादर करण्याची शेवटची तारीख असून निवडणूक मंगळवार दि. ७ जानेवारी २०२० रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांची अक्षरश: धांदल उडाली आहे.