पालघर : जिल्ह्यातील पालघर आणि विक्रमगडमध्ये भाजप - सेनेत झालेली बंडखोरी मोडून काढण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे या द्वयीला यश येत असताना बोईसर विधानसभा मतदार संघातील भाजपचे उपाध्यक्ष संतोष जनाठे यांचे बंड मात्र कायम आहे. त्यामुळे येथे सेना - भाजपमध्ये लढत दिसणार आहे. भाजप - सेनेकडून पूर्ण जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व मिळविण्याच्या दृष्टीने आगेकूच सुरू असून बविआसमोर मात्र आपले तीनही मतदारसंघ शाबूत ठेवण्याचे मोठे आव्हान आहे.
पालघर विधानसभेत सेनेचे विद्यमान आमदार अमित घोडा यांना डच्चू देत त्यांच्या जागी श्रीनिवास वनगा यांना शिवसेनापक्षातून उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर अमित घोडा यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादीच्या चिन्हावर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर विक्र मगड विधानसभेत माजी आदिवासी विकास मंत्री आणि पालकमंत्री विष्णू सवरा यांचे सुपुत्र डॉक्टर हेमंत सवरा यांना भाजपने उमेदवारी दिल्याने भाजपच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखा थेतले, विक्रमगड पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर खुताडे आणि भाजप आदिवासी सेलचे हरिश्चंद्र भोईर यांनी बंडखोरी करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर बोईसर विधानसभेतून सेनेचे उमेदवार विलास तरे यांच्याविरोधात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष जनाठे यांनी बंडखोरी करीत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
पालघरमध्ये सेनेतून बंडखोरी करून राष्ट्रवादी पक्षाकडून अमित घोडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने श्रीनिवासची वाट खडतर बनली होती. त्यामुळे अमित घोडा यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे प्रयत्न सुरू होते.शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे व आ. रवींद्र फाटक यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यामुळे पालघर विधानसभेत एकूण पाच उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत सेना महायुतीचे वनगा आणि काँग्रेस महाआघाडीचे योगेश नम यांच्यात होणार आहे. विक्र मगडमध्ये भाजपचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांच्यापुढे सुरेखा थेतले आणि इतर दोन उमेदवारांच्या बंडाचे आव्हान होते. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापूर्वी सर्व बंडखोर आपले अर्ज मागे घेतील असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर शनिवारी भाजपच्या सुरेखा थेतले आणि इतर दोन बंडखोरांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या. चर्चा झाल्यानंतर रविवारी एका हॉटेलमध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत या बंडखोरांची रात्री उशीरापर्यंत चर्चा झाली. त्यानंतर सोमवारी, अर्ज मागे घेण्याच्या दिवशी तिन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने डॉ. सवरा यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
विक्रमगड मतदारसंघात आता एकूण दहा उमेदवार रिंगणात असले तरी भाजपचे डॉ. सवरा आणि राष्ट्रवादी महाआघाडीचे सुनील भुसारा यांच्यात सरळ लढत होणार आहे. या मतदार संघात श्रमजीवी संघटनेने भाजपला पाठिंबा दिला असला तरी जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे, सेनेचे माजी जिप गटनेते प्रकाश निकम हे कुणाला पाठिंबा देतात यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.डहाणू मतदार संघात एकूण १० उमेदवार रिंगणात असून भाजप महायुतीचे विद्यमान आ. पास्कल धनारे, माकपाचे विनोद निकोले यांच्यात प्रमुख लढत रंगणार असून माकपला बविआ, काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक संघटनांचा पाठिंबा मिळणार असल्याने इथे लढत चुरशीची होणार आहे. लोकसभेत महा आघाडीला महायुतीपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले होते. शिवाय पास्कल धनारे यांच्याविरोधात नाराजी असल्याने त्याचा फटका त्यांना बसू शकतो.वसई मतदार संघात नेहमी प्रमाणे आ.हितेंद्र ठाकूर ह्यांनी आपली उमेदवारी निश्चित केल्या नंतर त्यांची लढत काँग्रेस मधून सेनेत प्रवेश घेतलेल्या उद्योगपती विजय पाटील यांच्याशी होणार आहे.भाजपमधील बंडखोर भूमिकेवर ठामबोईसर मतदारसंघात शिवसेनेने बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आ. विलास तरे यांना शिवसेनेतून उमेदवारी देत बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का दिला होता. तर दुसरीकडे भाजपने बंड करत येथे अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. भाजपची ताकद मोठी असूनही जागा वाटपात ही जागा सेनेला दिल्याने जनाठे यांनी आपण उमेदवारी अर्ज भरत असल्याचे सांगितले.त्यांनी आपला अर्ज मागे घ्यावा यासाठी अनेक प्रयत्न सुरू असले तरी ते २ दिवसापासून भूमिगत आहेत. त्यांच्या बंडखोरीमुळे बोईसर विधानसभेत विलास तरेंची डोकेदुखी वाढली असून जनाठे यांना विहिंप, बजरंग दल आदींसह अनेक संघटना आणि भाजपमधील अनेक पदाधिकाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे. त्यामुळे याचा मोठा फटका विलास तरे यांना बसू शकतो.या विधानसभेत एकूण ८ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत सेनेचे विलास तरे, बविआचे राजेश पाटील आणि भाजप बंडखोर संतोष जनाठे यांच्यात रंगणार आहे. हा मतदारसंघ बविआकडे असल्याने तो टिकवून ठेवण्याची कसरत आ. हितेंद्र ठाकूर यांना करावी लागणार आहे.प्रदीप शर्मा विरुद्ध क्षितिज ठाकूरनालासोपारा मतदार संघात सर्वाधिक १४ उमेदवार रिंगणात असले तरी बविआची अनेक वर्षांपासून या मतदारसंघात असलेली मक्तेदारी मोडून काढण्यासाठी शिवसेनेने चकमक फेम प्रदीप शर्मा यांना रिंगणात उतरविले आहे. त्यांची लढत विद्यमान आ. क्षितिज ठाकूर यांच्याशी होणार आहे. यावेळी आ. हितेंद्र ठाकूर व आ. क्षितिज ठाकूर आपल्या मतदारसंघाची अदलाबदल करतील, अशी अटकळ होती, मात्र तसे घडले नाही. या मतदारसंघात आरोप-प्रत्यारोपाचा सामना सुरू असून प्रदीप शर्मा यांनी व्यासपीठावर आमने-सामने येऊन आरोप करावेत असे आव्हान आ.क्षितिज ठाकूर यांनी दिले आहे. क्षितिज ठाकूर मोठ्या मताधिक्याने ह्या मतदार संघातून निवडून येत असले तरी सेनेने एक तगडे आव्हान बविआपुढे उभे केल्याने ही लढत चुरशीची होणार आहे.