वाडा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत चांगलीच रंगत आली असून सर्वच उमेदवारांचा प्रचार जोरदारपणे सुरू आहे. तालुक्यातील कुडूस गटात भाजप, शिवसेना व काँग्रेस अशी तिरंगी लढत होत असून भाजपसमोर ही जागा राखण्याचे आव्हान आहे.वाडा तालुक्यातील कुडूस गट हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असून या गटातून भाजपमधून डाकिवलीचे सरपंच स्वप्निल जाधव, सेनेकडून राजेश मुकणे, काँग्रेसकडून दामोदर डोंगरे तर किसान सभेकडून नितेश म्हसे हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात गेल्या वेळेस भाजपचे उमेदवार निवडून आले होते. या मतदारसंघात शिवसेनेचेही प्राबल्यही आहे. शिवसेनेच्या नेत्या व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. धनंजय पष्टे, युवासेनेचे नीलेश पाटील, सचिन पाटील, जनार्दन भेरे, प्रकाश पाटील, सुधीर पाटील अशा कार्यकर्त्यांची फौज या मतदारसंघात असल्याने त्यांच्यासाठी ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची ठरली आहे. काँग्रेसचे उमेदवार दामोदर डोंगरे हे कुडूस ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य असून त्यांना मानणारा वर्ग आहे. तसेच आघाडीचे नेते इरफान सुसे, मुस्तफा मेमन, अल्लारख मेमन, रामदास जाधव, डॉ. गिरीश चौधरी यांच्यावर डोंगरे यांच्या प्रचाराची धुरा असल्याने ते गावोगाव पिंजून काढीत आहेत. किसान सभेचे नितेश म्हसे किती मताधिक्य घेतात हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.भाजपचे मंगेश पाटील हे दुसऱ्या गटात निवडणूक लढवत असल्याने ते व्यस्त आहेत. त्यामुळे भाजपच्या प्रचाराची धुरा कुंदन पाटील, जगन्नाथ पाटील, अशोक जाधव यांच्यावर आहे. त्यामुळे या गटातील सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
भाजपसमोर जागा राखण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 12:02 AM