डहाणू : फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री पेटणारी होळी अधिक काळ प्रज्वलीत राहण्यासाठी लाकडाची बेगमी करण्यास गावोगावतील होळकरांनी प्रारंभ केला आहे. दरम्यान जंगल आणि सामाजिक विनकरणातील झाडांवर कुऱ्हाड चालण्या आधी गैरप्रकार रोखण्यासाठी डहाणू वन विभागाने कृती आराखडा आखल्याची माहिती उप वन संरक्षक एस. एन. लड्कत यांनी दिली. ग्रामीण भागात होळी हा सण साजरा करण्याची प्रत्येक गावातील लोकसंस्कृतीनुसार भिन्न पद्धत असली तरी होळी पेटविण्यासाठी जास्तीत-जास्त लाकडांचा वापर सर्वत्र दिसून येतो. भौगोलिकतेनुसार काही ठिकाणी चिंबी (बांबू), शिंदी आणि सुपारीचा खांब मध्यभागी ठेवून त्या भोवती लाकडे रचली जातात. एकाच गावात विविध जातीची, मंडळाची आणि रहिवासी विभागाती होळी वेगवेगळी पेटवली जाते. परंतु जास्त कालावधीत होळी प्रज्वलीत ठेवण्यासाठी स्पर्धा सर्वच ठिकाणी या काळात दिसून येते. त्यामुळे जंगल आणि वन विभागाने लावलेल्या झाडांची तोड मोठ्या प्रमाणात केली जाते. काही भागात कोंबड होळी आणि मोठ्या होळीच्या रात्री वणवा पेटवून जंगलातील प्राण्याची शिकार केली जाते. त्यानंतर त्या प्राण्यांचे मांस भाजून प्रसाद म्हणून वाटला जातो. या मुळे मोठ्या प्रमाणात झाडांचे नुकसान होते. हा गैरप्रकार रोखण्यासाठी वनविभागाने गस्त पथके तैनात केली आहेत.त्या दृष्टीने डहाणू उप वन संरक्षक एस. एन. लडकत यांच्या मार्गदर्शनाखाली कृती आराखडा आखण्यात आला आहे. दहा वन परीक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अंमलबाजवणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार दिवस-रात्र गस्तीपथक, वणवा नियंत्रण पथक या शिवाय संबंधित गावच्या नागरिकांना वृक्ष व प्राणी संवर्धनाकरीता जनजागृती केली जाणार आहे. (वार्ताहर)आगामी होळी सणाच्या दृष्टीने होणारी वृक्षतोड रोखण्यासाठी कार्यक्षेत्रातील दहा रेंज करिता कृती आराखडा आखून, स्पेशल पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार वणवा नियंत्रण आणि दिवस-रात्र गस्ती पथकाची नियुक्ती केली आहे.- एस. एन. लडकत,उप वन संरक्षक, डहाणू वन विभाग
वन विभागापुढे लाकूड चोरी रोखण्याचे आव्हान
By admin | Published: March 11, 2017 2:10 AM