पाली : मुंबई-गोवा महामार्गावर अंत्यत धोकादायक म्हणून सुकेळी खिंडीची ओळख आहे. सध्या मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर या दरम्यानच्या रस्त्याची कामे ही युद्धपातळीवर सुरू आहेत; परंतु जून महिना सुरू झाल्यामुळे पाऊस पडण्यास केव्हाही सुरुवात होऊ शकते. त्यामुळे सुकेळी खिंडीतील दरवर्षी जे मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याचे प्रमाण होते ते कमी करायचे असेल तर पावसाळ्याआधी या उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
मुंबई-गोवा मार्गावरील रस्त्याच्या कामासाठी सुकेळी खिंडीतील जे डोंगर खोदले गेले आहेत, त्यामुळे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या बाजूला मोठमोठे दगड तसेच माती मोठ्या प्रमाणात खाली आलेली आहे. त्यामुळे पोकळ झालेली माती व दगड पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाबरोबर खाली येऊन दरड कोसळून वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. दरवर्षी या खिंडीमध्ये दरड कोसळून मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असते. त्याचप्रमाणे रस्त्याच्या साइडपट्टीही उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यातच रस्तासुद्धा अरुंद असल्यामुळे कधी कधी गाडी ओव्हरटेक करण्याच्या नादात गाडी साइडपट्टी सोडून गेल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर का सुकेळी खिंडीतील रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या डोंगरांना पावसाळ्याच्या आधीच संरक्षण भिंत घातली तरच यावर्षी दरडी कोसळण्याचे प्रमाण कमी करून वाहतूककोंडी नियंत्रणात आणता येऊ शकते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्याआधीच सुकेळी खिंडीत योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.