पालघर : पाण्याच्या योग्य नियोजनाच्या दृष्टीने वनराई बंधाºयाचे महत्व अबाधित असून त्यादृष्टीने पालघर येथील यशवंतराव चाफेकर महाविद्यालयाने विश्रामपूर येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून बंधारे बांधणे, ग्रामस्वच्छता व स्वयंस्वच्छता शिबिराचे आयोजन केले होते.विश्रामपूर (खडकोली) येथे २५ ते ३१ डिसेंबर दरम्यान पालघर येथील यशवंतराव चाफेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य, बॅफ व बीएमएसच्या विद्यार्थ्यांचे निवासी शिबिर संपन्न झाले आहे. या दरम्यान, विद्यार्थ्यांनी विश्रामपूर गावात स्वच्छता अभियान राबविले, १० शौच खड्डे खोदण्यात आले, झाडांच्या वाढीच्यादृष्टीने सागाच्या झाडांची फूट विरणी करण्यात आली, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्वयं स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत हात धुऊन विद्यार्थ्यांची नखे काढण्यात आली, तसेच नदीच्या पाण्यातील गाळ काढून पाणी अडविण्याच्या दृष्टीने ४५ फुट लांबीचा वनराई बंधारा श्रमदानातून बांधण्यात आला.विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत व बौद्धिक विकासासाठी डॉ. उमेश दुम्पलवार, पत्रकार निरज राऊत, पंकज राऊत, प्रशांत पाटील, डॉ. हेमंत मुकणे आदींच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शिबिरा दरम्यान मुंबई विद्यापीठाचे रासेयोचे समन्वयक बाबासाहेब बिडवे, रासेयोचे विभाग समन्वयक प्रा. विवेक कुडू, वनविभाग अधिकारी अमोल पिंपळे, विश्रामपूर गावाचे सरपंच संतोष तर यांनी शिबिराला भेटी दिल्या.
चाफेकरच्या विद्यार्थ्यांनी बांधला ४५ फुट वनराई बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 2:28 AM