लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरारोड मध्ये १५ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या ३ किलो चरस साठ्यासह एका महिलेस अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे .
मीरारोडच्या तिवारी इंजिनियरिंग कॉलेज व सेवन इलेव्हन क्लब परिसरात असलेल्या मार्गावर केडी एम्पायर नावाची इमारत आहे . सदर इमारतीच्या मार्गावर एक महिला चरस ह्या अमली पदार्थांच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी कक्षातील शिपाई ए . बी. यादव यांना मिळाली . त्यांनी वरिष्ठांना याची माहिती दिल्यावर निरीक्षक देविदास हंडोरे , सहायक निरीक्षक तेजश्री शिंदे व विलास कुटे सह यादव , पावन पाटील , पी . डी . टक्के , डी . एस . इंगळे , व्ही. ए . घरबुडे यांच्या पथकाने के डी एम्पायर इमारत परिसरात सापळा रचला . त्यावेळी फ्युजन डिलाईट केक दुकानासमोर रिक्षातून संशियत महिला उतरताच पोलीस पथकाने तिला ताब्यात घेतले .
अटक महिलेचे नाव शहनाज सलीमुद्दीन शेख उर्फ सना (३०) रा . रा. रमाबाई चाळ, माशाचा पाडा, काशीमीरा असे असून तिच्या कडील पर्स मधून ३ किलो १६५ ग्राम वजनाचे व १५ लाख ७५ हजार रुपये किमतीचे चरस हे अमलीपदार्थ सापडले . पोलिसांनी चरस सह तिचा मोबाईल जप्त करून मीरारोड पोलीस ठाण्यात ५ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला आहे . पोलीस पुढील तपास करत आहे .