वसई : नालासोपारा रेल्वे स्थानकात महिलांच्या डब्यात शिरून, चोरट्याने एका तरुणीचे दोन मोबाइल फोन लंपास केले. त्याला पकडण्याच्या प्रयत्नात धावत्या लोकलमधून पडून तरुणी जखमी झाली. या वेळी महिलांच्या डब्यातील पोलीस डब्यात नव्हता. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.वसईतील आनंदनगरात राहणारी आरती सॅलियन (३२) शनिवारी रात्री १०च्या सुमारास नालासोपाराहून लोकल पकडून वसईला निघाली होती. त्या वेळी महिलांच्या डब्यात दोन-तीन महिला होत्या. लोकल सुरू होण्यापूर्वी एक अनोळखी इसम अचानक डब्यात शिरला आणि बेसावध असलेल्या आरती यांच्या हातातील दोन मोबाइल हिसकावून घेऊन डब्यातून उतरून पसार झाला. त्या इसमाला पकडण्यासाठी आरती डब्यातून उतरत असतानाच गाडी सुरू झाली. त्यामुळे तोल जाऊन प्लॅटफॉर्मवर पडल्याने आरती जखमी झाल्या. या प्रकरणी वसई पोलिसांनी अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.चोर पकडण्यात अपयशया आधी १५ दिवसांपूर्वी विरारहून नालासोपारा येथे निघालेल्या कोमल चव्हाण यांना एका माथेफिरूने महिलांच्या डब्यातून ढकलून दिले होते. या घटनेचे चित्रीकरण सीटीटीव्हीत झाले असून, पोलिसांनी माथेफिरूचे स्केचही जाहीर केले आहे. मात्र, आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यातच पुन्हा महिलांच्या डब्यात घुसलेल्या चोरट्याने मोबाइलची चोरी केल्याची घटना घडली. या दोन्ही घटनांच्या वेळी महिलांच्या डब्यात पोलीस कर्मचारी हजर नव्हता.
नालासोपारा स्थानकात तरुणीवर पुन्हा हल्ला, मोबाइल चोरून चोरटा पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 1:19 AM