नालासोपारा - दोन्ही पायाने अपंग असलेले जेष्ठ नागरिक यांच्या नालासोपारा शहरातील बँकेच्या खात्यातून पैसे लंपास झाल्याची घटना घडली असून ते न्यायासाठी व पैशासाठी तब्बल ८ महिन्यापासून बँकेत आणि तुळींज पोलीस ठाण्यात फेऱ्या मारत असून त्यांच्या पदरी निराशा पडली आहे.हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीतून सेवा निवृत्त झालेले व दोन्ही पायाने अपंग असलेले जेष्ठ नागरिक विलास पांडुरंग पांचाळ (६९) यांनी नालासोपारा येथील टाकी रोड येथील घर विकून कायमचे देवगड येथील गावी राहण्यास गेले. परंतु गेल्या २५ वर्षांपासून नालासोपारा पश्चिमेकडील बँक आॅफ महाराष्ट्र खाते सुरू असून याच खात्यात त्यांची पेन्शन येत असल्याने ती काढण्यासाठी दर महिन्याला गावावरून येतात. घर विकल्यानंतर कर्ज फेडून उरलेली २ लाख ४० हजार रु पयांची रक्कम याच खात्यात शिल्लक ठेवली होती. या खात्यामधून ११ जून २०१८ ते २१ जून २०१८ या १० दिवसांच्या दरम्यान बनावट एटीएम कार्डने २ लाख ४० हजार रु पये अज्ञाताने काढले. सप्टेंबर २०१८ ला पेन्शन काढण्यासाठी बँकेत विलास पांचाळ आल्यावर खात्यात पैसे शिल्लक नसल्याचे बँक कॅशियरने सांगितले. पैसे कसे काय गेले याची विचारणा केल्यावर तुम्हाला स्टेटमेंट देतो, तुम्हाला मोबाईलवर मॅसेज आले असतील बँकेने अशी उत्तरे दिली. जेव्हा पांचाळ यांनी संपूर्ण परिवारासोबत आत्महत्या करतो असे धमकावल्यावर बँकेच्या उच्च अधिकाऱ्यांनी मार्ग काढतो असे आश्वासन दिले. १ जानेवारी २०१९ ला बँकेने त्यांच्या खात्यावर २ लाख ४० हजार रुपये जमा केले पण ते काढू शकत नसून हॉल्ट वर असल्याचे बँक मॅनेजर कडून सांगण्यात आले. बँक कमिटीने दावा रद्द झाल्याचे कारण देऊन जमा केलेली रक्कम २१ जानेवारी २०१९ ला वळवून घेतली. तेव्हापासून ते न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.
भामट्याकडून फसवणूक अन् बॅँकेनेही केले हात वर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 3:50 AM