मीरारोड - परदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांवर आमदार गीता जैन यांच्या मागणी नंतर नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता पर्यंत १६६ जणांचे पासपोर्ट पोलिसांना सापडले असून आत पर्यंत फसवणुकीची रक्कम ८१ लाख रुपये इतकी आहे. फसगत झालेल्यांची संख्या आणि फसवणुकीच्या रकमेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
परदेशातील साऊथ आफ्रिका, इराण, इरान आदी देशां मध्ये चांगल्या पगाराची नोकरी देण्याच्या जाहिराती सोशल मीडिया आणि अन्य माध्यमांवर देण्यात आल्या होत्या. त्यात भाईंदर पूर्वेच्या जेसलपार्क येथील ईगल प्लेसमेंट ह्या कार्यालयाचा पत्ता होता. सदर कार्यालयात व ह्या नोकऱ्यां साठी कॉल करण्या पासून पासपोर्ट व अन्य कागदपत्रे मागवून घेणे, पैसे स्वीकारणे आदी कामे स्वतःची नावे साहिल शेख, सुरुची मॅडम आणि नरसुल्लाह अहमद शेख अशी सांगणारे करत होते.
ह्यात केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशाच्या अनेक राज्यातून परदेशी नोकरी मिळेल म्हणून अनेकांनी पैसे भरले व आपले पासपोर्ट देखील जमा केले. परंतु नोकरी नाही, पैसे परत नाही आणि पासपोर्ट देखील मिळाला नाही. शिवाय प्लेसमेंटचे कार्यालय बंद असल्याने आपली फसणूक झाल्याचे लोकांना लक्षात आले. नवघर पोलीस ठाण्यात पोलिसां कडून सुरवातीला तात्काळ दखल घेतली न गेल्याने फसगत झालेल्या लोकांनी आमदार गीता जैन यांची २७ एप्रिल रोजी भेट घेतली.
फसवणुकीचा प्रकार गंभीर असल्याने आ. जैन यांनी पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांना कॉल करून गुन्हा दाखल करा व आरोपीना अटक करून लोकांचे पासपोर्ट आणि पैसे परत मिळवून द्या अशी मागणी केली. फसगत झालेल्या लोकांसह त्या स्वतः नवघर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. पोलीस अधिकाऱ्यां सोबत चर्चा करून त्यांनी कारवाईची मागणी केली.
त्या नंतर पोलिसांनी पंजाबच्या पठाणकोट मधील बनवाल गावातून आलेल्या पवन नसीब सिंग ( वय ३८ ) यांच्या फिर्यादी वरून साहिल शेख, सुरुची मॅडम आणि नरसुल्लाह अहमद शेख ह्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी ईगल प्लेसमेंट कार्यालयात छापा टाकला असता तेथून सुमारे १६६ जणांचे पासपोर्ट पोलिसांना सापडले. गेल्या दोन दिवसात पोलिसांनी १५९ जणांचे पासपोर्ट परत केले असून त्यांच्या फसवणुकी बद्दल जबाब नोंदवून घेतला आहे.
२०० पेक्षा जास्त लोकांची ह्या टोळीने फसवणूक केल्याची शक्यता असून आता पर्यंत फसगत झालेल्या रकमेचा आकडा सुमारे ८१ लाख रुपये इतका झाला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विशाल धायगुडे हे तपास करत आहे. तर गुन्ह्याची व्याप्ती आणि गांभीर्य पाहता मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने देखील आरोपींचा शोध चालवला आहे.