रविंद्र साळवे , मोखाडाकुपोषणामुळे संपूर्ण देशाचे लक्ष वेधणाऱ्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात आज कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून शिबिरात करण्यात आली. श्रमजीवी संघटना आणि विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्ट यांनी त्याचे आयोजन केले होते. कुपोषण हा आजार नसून उपासमार आहे. परिणामी आम्ही तापासलेली सर्वच बालके आणि त्यांच्या माता देखील कुपोषित आहेत, असे मत यावेळी बालरोग तज्ञ डॉ.हेमंत जोशी यांनी व्यक्त केले.३० आॅगस्ट रोजी खोच (कलमवाडी) सागर वाघ या बालकाचा कुपोषणाने मृत्यू झाला होता. यानंतर एकट्या पालघर जिल्ह्यात वर्षभरात सुमारे ६०० बालमृत्यू झाल्याचे श्रमजीवी संघटनेने उजेडात आणले मात्र कोरडे सांत्वन न करता तिने गावागावात कुपोषण निर्मूलन अभियान युद्धपातळीवर सुरु ठेवले आहे. आज हे शिबिर वाशाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित केले होते. त्यासाठी बालरोग तज्ञ श्रमजीवी कडून आमंत्रित करण्यात आले होते.यावेळी ४३ गावांमधील ४ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात २९५ बालकांना तपासण्यात आले. यावेळी बालकांना आणि मातांना ग्लुकोज बिस्किट्स आणि जेवण पुरविण्यात आले. या तपासणीत सर्वच बालके कुपोषित आढळली तर ५७ बालकं अतितीव्र कुपोषित आढळली. यापैकी ४ बालकांना बालरोग तज्ञाच्या देखरेखीखाली तर २६ बालकांना संजीवन छावणीत दाखल करण्याच्या सूचना डॉक्टरांनी केल्या. या तपासणीसाठी डॉ. हेमंत जोशी, डॉ. गोपाळ कडवेकर, डॉ. ऋग्वेद दुधाट, डॉ. रोहित, डॉ. मोहन दुधाट यांचा सहभाग होता. या शिबिरासाठी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित दिवसभर उपस्थित होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, अतिरिक्त संचालक (आरोग्य सेवा) डॉ.अर्चना पाटील, तहसीलदार राहुल सारंग, गटविकास अधिकारी गोडांबे यांनी भेट दिली. या शिबिरासाठी श्रमजीवीचे विजय जाधव, सुरेश रेंजड, प्रमोद पवार, ज्ञानेश्वर शिर्के, पांडुरंग मालक, संतोष धिंडा, गणेश माळी, कमलाकर भोर, अजित गायकवाड, महेश धांगडा, आशा भोईर, ममता परेड, वसंत वाझे, निलेश वाघ यांनी परिश्रम घेतले. कुपोषित बालकांना तपासणीची, उपचाराची आणि पोषक आहाराची अत्यंत गरज असल्याचे या शिबिरातून पुन्हा समोर आले. त्यामुळे जव्हार मोखाड्यातील सर्वच बालकांची तपासणी करण्यात येणार आहे. सेवाभावी वृत्तीने काम करण्याची इच्छा असणाऱ्या बालरोग तज्ज्ञांनी पुढे येऊन या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.राहुलच्या कुटुंबाला अजूनही रेशनकार्ड नाहीजव्हार तालुक्यातील रुईघर येथील कुपोषणाने मृत्यू पावलेल्या राहुल वाडकरच्या कुटुबियांकडे आजही रेशनकार्ड नाही. २ वर्षांच्या व वजन ५ किलो असलेल्या राहुलचा २१ सप्टेंबरला नाशिकच्या सिव्हील रुग्णालयात मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबियांच्या ना मंत्र्यांनी ना विरोधी नेत्यांनी भेटी घेतल्या. पालघर जिल्ह्यातील कोणत्याही वरिष्ठ अधिका-यांनीही तेथे धाव घेतली नाही. गटविकास अधिकारी व सभापती हे सोडले तर कुणीही त्यांच्याकडे फिरकले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. वाडकर याच्या कुटुंबीयात आई-वडील,२ बहिणी आजी आहेत. त्यातील छोटी बहीण ७ महिन्यांची आहे. तिचे वजनही फक्त १ किलोच्या आसपास आहे. त्यांच्या कडे अजूनही रेशनकार्ड नाही. त्यामुळे या कुटुंबाला रेशनचे धान्य कसे काय मिळणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यांच्या घरात ना धड भांडी, ना अंथरुण पांघरुण अशी अवस्था आहे. जव्हारपासून ४३ कि.मी. अंतरावर असलेले रु ईघर हे गाव गुजरात व दादरानगरहवेलींच्या सरहद्दी लगत आहे. त्यामुळे या गावात राहणाऱ्या ९८ कुटुंबीयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. हे गाव चालतवड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत आहे. परंतु येथील रुग्णांना तिथे जाण्यासाठी ३५ कि.मी. जावे लागते. रस्ते व वाहनांच्या सुविधा नसल्याने ते ही शक्य होत नाही. हे गाव आदिवासी विकास मंत्री- विष्णू सवरा यांच्या विक्र मगड मतदार संघातील असूनही त्याची ही दुर्दशा आहे.
मोखाडयात कुपोषितांची तपासणी
By admin | Published: September 26, 2016 2:03 AM