पाली : लोकसभा निवडणुकीशी संबंधित कामकाजात वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना चेकपोस्ट स्थिर देखरेख पथकात समाविष्ट करून वेठीस धरले जात असल्याचे समोर आले आहे. सलग बारा तास दिवस-रात्र पाळीच्या रूपाने प्राध्यापकांवर जबाबदारी सोपवल्याने पदवी व पदव्युतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या संदर्भात प्राध्यापकांनी निवडणुकीच्या कामकाजातून सूट मिळावी या मागणीचे निवेदन पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावर यांना दिले.
निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर झाल्याने अद्यापपर्यंत कोणताही निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेतला गेलेला नाही. आदर्श आचारसंहिता राखण्याच्या दृष्टिकोनातून एफ.एस.टी., एम.सी.सी., एस.एस.टी./ एफ.एस. व व्ही.व्ही.टी. अशा स्वरूपाची पथके तयार केली आहेत. या पथकातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा अथवा सुरक्षा पुरविण्यात आली नसल्याची ओरड सुरू आहे. विशेषत: देखरेख पथकात जिल्ह्यातील पेण व सुधागडच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांचा सर्वाधिक समावेश आहे. या पथकात एस.एस.टी. प्रकारात प्राध्यापकांचा समावेश असून प्राध्यापकांना दिवसा व रात्री रस्त्यावर उभे राहून वाहने थांबवून तपासणी करण्याचे काम सोपविले आहे. त्यामुळे वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांसमोर परीक्षा तोंडावर आलेल्या असताना उर्वरित अभ्यासक्र म पूर्ण कसा करावा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबरोबरच दुसऱ्या बाजूला शासनाने सोपविलेले स्थिर देखरेख पथकाचे काम कसे करावे अशा द्विधा मन:स्थितीत प्राध्यापक सापडलेले आहेत. यावर संबंधित प्रशासनामार्फत योग्य तो निर्णय घेवून विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून प्राध्यापकांना निवडणुकीच्या कामकाजातून सूट देऊन सुशिक्षित बेरोजगारांना हे काम देण्यात यावे अशीही मागणी आहे.शैक्षणिक नुकसान आणि दमछाकमहाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापकांना ११ मार्चपासून थेट निवडणुकीच्या कामकाजाला जुंपले असल्याने वर्गातील तासिकांवर थेट परिणाम झाला आहे. तसेच प्राध्यापक महाविद्यालयात नसल्याने विद्यार्थी महाविद्यालयाकडे पाठ फिरवीत आहेत. त्यामुळे देखील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबरोबरच महाविद्यालयातील प्राध्यापकांना विविध विषयाच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याबाबतचे आदेश मुंबई विद्यापीठाकडून आले आहेत. त्यामुळे प्राध्यापकांची दमछाक व कसरत होत आहे.