मोखाडा : आदिवासी विकास महामंडळाकडून आदिवासींना देण्यात येत असलेल्या सडक्या तांदळाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली असून असा तांदूळ वाटप करण्याचे तातडीने बंद करून दर्जेदार तांदूळ देण्याबाबत अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.
कोरोना महामारीमुळे रोजगार हरवलेल्या आदिम कातकरी बांधवांना तातडीची मदत म्हणून तब्बल ७ महिन्यानंतर प्रति कुटुंब २० किलोग्रॅम तांदूळ वाटप करण्याचे काम आदिवासी विकास महामंडळाने सुरू केले होते. हे तांदूळ अत्यंत निकृष्ट आणि सडके असल्याचे श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी २० दिवसांपूर्वी शासनाच्या निदर्शनास आणले होते. हे तांदूळ २०१४-१५ वर्षातील शिल्लक तांदूळ असून त्यांची विक्री होत नसल्याने ते आदिवासींना वाटप करण्यात येत आहेत, हे अधिकाऱ्यांनी श्रमजीवीच्या आंदोलनात कबुल केले होते. याच वेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना प्रत्यक्ष भेटून विवेक पंडित यांनी हे सडके तांदूळ त्यांना दाखवले होते. मात्र तरीही बुधवारी हेच तांदूळ पुन्हा पॉलिश करून वाटप करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आदिवासी विकास महामंडळ अधिकाऱ्यांचा डाव श्रमजीवी संघटनेने हाणून पाडला.रायगड जिल्ह्यातील वाकडी आणि पालघर जिल्ह्यातील भिनार या ठिकाणी या तांदळाच्या गाड्या श्रमजीवी कार्यकर्त्यांनी पकडल्या. या पार्श्वभूमीवर गुरुवारी पंडित आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.
या वेळी एका अधिकाऱ्याने आदिवासी तांदूळ घेतात, मग विरोध कशाला करता? असे सांगताच संतप्त होऊन पंडित यांनी त्या अधिकाऱ्याची चांगलीच खरडपट्टी केली. आदिवासी माणसे आहेत,जनावरे नाहीत, असे सांगत हे आम्ही खपवून घेणार नाही, असे स्पष्ट सांगितले. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत तातडीने हे वाटप बंद करण्याचे आदेश दिले.
मूलभूत प्रश्न सोडवण्याबाबत कटिबद्धश्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थान येथे भेट घेतली. श्रमजीवी शिष्टमंडळाने आदिवासींच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री ठाकरे यांचे या वेळी लक्ष वेधले. १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय स्वातंत्र्याची पंचाहत्तरी आहे, त्यापूर्वीच आदिवासींच्या किमान मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करून त्यांच्या दारात स्वातंत्र्याचा प्रकाश पोहोचवण्याबाबत कटिबद्द राहणार असल्याचे आश्वासक विधान या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.