डहाणू/बोर्डी : येत्या १ आणि २ फेब्रुवारी रोजी बोर्डी येथे एस.आर. सावे कॅम्पिंग ग्राउंडवर आठव्या चिकू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षी झालेल्या चिकू महोत्सवामध्ये दीड लाख पर्यटक व स्थानिकांनी भेट दिली होती. यंदा सुमारे दोन लाखांचा टप्पा पार होईल, असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. रुरल आंत्रप्रिनरशिप वेल्फेअर फाउंडेशन या संस्थेतर्फे हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.पालघर जिल्ह्यातील डहाणू, बोर्डी, घोलवड आणि परिसरातील गावांमध्ये चिकू फळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. चिकू आणि त्यापासून बनविलेल्या प्रक्रिया उद्योगातून उत्पादित मालाला बाजारपेठ निर्माण व्हावी तसेच बोर्डी परिसरातील पर्यटन विकसित व्हावे, स्वयंरोजगार व गृहउद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन मागील सलग सात वर्षांपासून केले जाते. त्याला व्यापक स्वरूप प्राप्त झाले असून गतवर्षी सुमारे दीड लाखांहून अधिक स्थानिक आणि परगावातील लोकांनी महोत्सवाला भेट दिल्याची माहिती आयोजकांनी दिली.बोर्डी येथील कॅम्पिंग ग्राऊंड येथे १ आणि २ फेब्रुवारी या दोन दिवसात विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. ‘चिकू की कहानी’ या सत्रामध्ये चिकू फळाच्या वाटचालीविषयी तर ‘चिकूच्या कट्ट्यावरून’ या सत्रामध्ये स्थानिक उद्योजकांच्या वाटचालीबाबत माहिती दिली जाणार आहे. वेगवेगळी खाद्य संस्कृती आणि खाद्यपदार्थांच्या पाककृतीसाठी विशेष कार्यक्रम असणार आहे.तर पारंपरिक आणि भारतीय संगीतावर आधारित करमणुकीच्या कार्यक्रमाचे सादरीकरण असणार आहे. या महोत्सवातून स्थानिक शेतकरी व महिला उद्योजकांना लाभ व्हावा तसेच चिकू फळाचा प्रचार व प्रसार व्हावा हा महोत्सवाच्या आयोजनाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.महोत्सवाचे आकर्षणसमुद्रकिनाऱ्यालगतच्या रस्त्यावर ‘चिकू महोत्सव दौड’चे आयोजन केले आहे. स्थानिक कलाकारांकडून त्यांच्या पारंपरिक कलाकृतींची कार्यशाळा, चिकू सफारी आणि वायनरी टूर, आकाश निरीक्षण कार्यक्रम असे विविध उपक्रम, स्थानिक उत्पादने, खाद्यसंस्कृती यासह सुमारे दोनशे स्टॉल उभारण्यात येणार आहेत.
बोर्डीत १-२ फेब्रुवारीला चिकू महोत्सव; दोन लाख पर्यटक, नागरिक भेट देण्याचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 5:25 AM