- धीरज परब
मीरारोड - मीरारोडच्या हटकेश भागात शिवसेनेच्या महिला आघाडीने रविवारी सायंकाळी सार्वजनिक ठिकाणी प्रसूती वेदनेने विव्हळत पडलेल्या एका नायजेरियन तरुणीचे बाळंतपण सुखरूप केले.
मीरारोडच्या हाटकेश भागात नायजेरियन नागरिकांच्या उच्छाद आणि गैरप्रकारांविरोधात शिवसेनेचे स्थानिक शाखा प्रमुख महेश शिंदे सह शिवसैनिक व स्थानिक नागरिकांनी गेल्या काही वर्षांपासून सतत तक्रारी - आंदोलने केली आहेत. परिणामी, या परिसरात नायजेरियन नागरिकांचे चालणारे गैरप्रकार कमी झाले आहेत. परंतु या भागात गेल्या दीड दोन वर्षांपासून गिफ्ट नावाची ३० वर्षीय नायजेरियन तरुणी भटकत असते. तिच्यावर मानसिक परिणाम झाल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यातच सदर तरुणी गरोदर राहिली.
रविवारी सायंकाळी ती हाटकेशमधील मंगलनगर येथील पालिका मंडईच्या प्रवेश द्वारावर अर्धनग्न अवस्थेत प्रसूती वेदनांनी विव्हळत पडली होती. तिला प्रसूती वेदनेने विव्हळताना पाहून शिवसेनेच्या महिला शाखा संघटक छाया कापडणेकर यांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यांच्या सोबत विमल ठेंगे, ईस्टर नाडार सुद्धा होत्या. बाळाचे डोके किंचितसे बाहेर आलेले पाहून त्यांनी लगेच तिला मंडईच्या आत घेऊन प्रवेशद्वार लावले. तेथील गोणी आदींच्या सहाय्याने पडदा तयार केला. त्यावेळी तेथील अन्य काही महिला देखील मदतीला आल्या. नायजेरियन महिलेला धीर देत तिचे बाळंतपण या महिलांनी सुखरूप केले. नजीकच असलेल्या एका रुग्णालयातील परिचारिकेला बोलावून आई व बाळाची नाळ वेगळी केली.
यादरम्यान शाखा प्रमुख महेश शिंदे यांनी पालिकेची रुग्णवाहिका आणि पोलिसांना कळवले. पालिकेची रुग्णवाहिका आली त्यातून तिला मीरारोडच्या भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयात नेण्यात आले. सदर नायजेरियन महिला आणि तिची नवजात मुलगी सुखरूप असून बाळाचे वजन देखील ३ किलो पेक्षा जास्त असल्याचे कापडणेकर म्हणाल्या.
परदेशी तरुणी अत्याचाराची शिकार? सदर तरुणी ही परिसरात भटकत असे. तिला मानसिक आजार असल्याने याचा गैरफायदा घेऊन कोणीतरी तिच्यावर अतिप्रसंग केल्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून सदर परदेशी महिलेस न्याय मिळवून देण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.