जान्हवी मोर्ये
डोंबिवली : शारीरिक कवायत आणि खेळाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी डीएनसी शाळेतर्फे ३५ वर्षांपासून शाळेच्या क्रीडांगणावर शारीरिक कवायत दिवस साजरा केला जात आहे. यंदा शनिवारी हा दिवस साजरा होणार आहे. परंतु, सध्याच्या मुलांना मोबाइल गेमने पछाडले आहे. त्यामुळे ते मैदानापासून दुरावल्याची खंत शारीरिक शिक्षणाच्या (पीटी) शिक्षकांनी व्यक्त केली.
कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक असोसिएशन मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण इंगळे म्हणाले, सध्या मुलांना लहानपणापासून मोबाइल दिला जात आहे. त्यामुळे ते मोबाइल गेम्सच्या आहारी गेले आहेत. परिणामी, त्यांना शारीरिक खेळात रस राहिलेला नाही. पालकांचेही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. मैदानी खेळांच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याऐवजी ते मोबाइलवरील पबजीसारख्या खेळांमध्ये स्पर्धा करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोबाइलपासून दूर ठेवण्यासाठी प्रगती महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडे मोबाइल सापडला, तर त्याला ५०० रुपयांचा दंड आकारला जातो. हाच नियम सगळ्या शाळांनी केला पाहिजे. अनेक शाळांना मैदाने नाहीत. हा शाळांचाही दोष आहे. मैदाने नसली तरी शारीरिक शिक्षण आवश्यक आहे. अनेक शाळांमध्ये शारीरिक शिक्षकांचा पत्ताच नाही. कल्याण-डोंबिवलीत ३३३ शाळा आहेत. त्यापैकी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये केवळ १०० शाळाच सहभागी होतात. सरकारने शारीरिक प्रशिक्षणाच्या शिक्षकांची २५० पदे भरली आहेत. मात्र, खाजगी शाळांत पाच ते नऊ हजार इतक्या कमी वेतनावर त्यांना राबवून घेतले जाते.