वाडा : तालुक्यातील वरसाळे या आदिवासी बहुल गावातील प्राथमिक शाळेत उच्च माध्यमिक वर्ग सुरू करून जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ऐतिहासिक पाऊल उचलले खरे. मात्र याबाबत पूर्ण तयारी नसल्याने या वर्गांची दुरवस्था झालेली दिसते आहे. निम्मे वर्ष उलटल्यावर महत्त्वाच्या विषयांसाठी पालकांनी आंदोलन केल्यावर शिक्षक मिळाला. आता तर नववीचा वर्ग जीर्ण झालेल्या समाजगृहात भरविण्याची वेळ शाळेवर आली आहे.ग्रामीण भागातील तळागाळात जिल्हा परिषद विभाग शिक्षणाची सेवा देत असून वाडा तालुक्यातील वरसाळे या शाळेत पहिल्यांदाच उच्च माध्यमिक शाळेच्या अनुषंगाने नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले. नववीच्या वर्गात ६२ तर दहावीला येथे ४६ विद्यार्थी आहेत. वरसाळे या शाळेचा एकूण पट ३९५ इतका आहे. पहिली ते आठवीसाठी ७ तर नववी आणि दहावीसाठी ३ शिक्षक असून ते तात्पुरत्या वेळेसाठी सेवेत आहेत.
नववीचा वर्ग शाळेजवळ असलेल्या एका समाजगृहात भरविला जात असून हे समाजगृह जीर्ण तसेच नादुरुस्त आहे. शाळेत एक इमारत नव्याने बांधली जात असून तिचे कामही संथ गतीने सुरू आहे. उच्च प्राथमिक वर्गासाठी प्रयोगशाळा गरजेची आहे मात्र येथे तिचाही अभाव आहे. वरसाळे ही शाळा उच्च माध्यमिक वर्गात मोडत असल्याने वार्षिक खर्चाचा फंड या शाळेला दिला जात नाही. यामुळे शाळा चालविण्यासाठी लागणारा किरकोळ खर्च करणे शाळेला अवघड होत आहे.या शाळेत दोन वर्ग खोल्यांची इमारत अंतिम टप्प्यात आहे, शिवाय येथील तात्पुरत्या शिक्षकांना दिला जाणारा पगार आणि शाळेच्या खर्चासाठी निधी हा वरिष्ठ पातळीवरील निर्णय असून त्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होणे अपेक्षित आहे.- जयवंत खोत,गट शिक्षणाधिकारी,वाडा पंचायत समिती