विरार : नालासोपारा जवळील धानीव बाग येथील विहीरीत आठ वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. कर्ज न फेडल्यानेच सावकाराने मुलाला विहीरीत फेकून मारल्याचा आरोप मुलाच्या पालकांनी केला.सोमवारी रात्री सूरज रामभजन चौहान (८) या मुलाचा मृतदेह धानीव बाग येथील विहीरीत सापडला होता. सूरजचे वडील रामभजन भाजीविक्रेते असून त्यांनी काही महिन्यांपूर्वी धंदा करण्यासाठी नगीनदास पाडा येथील सावकाराकडून आपल्या घराच्या तारणावर ५० हजार रुपये व्याजाने घेतले. हि रक्कम त्यांनी ३ महिन्यात परत करत घराचे तारण ठेवलेले अॅग्रिमेन्ट परत मागितले. पण सावकाराने सापडत नसल्याचे कारण देऊन कागदपत्रे दिली नाहीत. दरम्यान रामभजनने परत २० हजार व्याजाने घेतले होते. धंद्यात मिळालेल्या पैशातून त्याने आपले घर बांधले.२० हजार रुपयांसाठी सावकाराने रामभजनच्या मागे तगादा लावला होता. सावकाराने वीस हजारावर चक्रवाढ व्याज आकारून अडीच लाख रुपयांची मागणी केली होती. त्यावरून दोघांत वाद झाला होता. परवा संध्याकाळी सावकाराने घरी जाऊन रामभजनला मारहाण केली आणि त्याचे सर्व सामान रस्त्यावर फेकून घराला कुलूप लावले. काल संध्याकाळी रामभजन आणि त्याची पत्नी मदतीसाठी फिरत होते. त्यावेळी सावकार रामभजनच्या घरी गेला होता. रामभजनच्या दोन मुली आणि सूरज घरी होते. सावकाराला पाहून त्या मुली लपल्या. खेळत असलेला सूरज अचानक गायब झाला. मुलींनी त्याचा शोध घेतला. पण तो कुठेच सापडला नाही. रात्री शेजारच्या विहिरीत त्याचा मृतदेह सापडला. ज्या विहिरीत सुरजचा मृतदेह सापडला त्या विहिरीला पत्र्याचे कुंपण आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर तपास वालीव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. (वार्ताहर)
नालासोपाऱ्यात मुलाचा मृत्यू
By admin | Published: November 18, 2016 6:32 AM