लोकमत न्यूज नेटवर्क विक्रमगड : कधीकाळी घनदाट वनसंपदा अस्तित्वात असलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा या तालुक्यांतील जंगले बेसुमार वृक्षतोड आणि नागरीकरणामुळे झपाट्याने नामशेष होत आहेत. या भागातील वनसंपदा पुन्हा फुलवण्यासाठी केशवसृष्टी ग्रामविकास संस्थेच्या ५० गावांतील माधव संस्कार केंद्रातील चिमुकले विद्यार्थी जूनपर्यंत सुमारे एक लाख सीडबॉल्स तयार करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा हे दुर्गम तालुके पावसाळ्यात हिरव्यागार वनश्रीने नटलेले असतात, मात्र, दिवाळीनंतर नद्यांचे पाणी आटताच हाच भाग भकास होऊन डोंगर-टेकड्या बोडक्या होतात. काही वर्षांपूर्वी या दुर्गम आदिवासी तालुक्यात विपुल वनसंपदा अस्तित्वात होती. अनेक कारणांनी या वनस्पतींचा ऱ्हास झाला आणि हा परिसर भकास झाला. या परिसरात मागील १० वर्षांपासून ग्रामविकासाचे काम करणाऱ्या केशवसृष्टी ग्रामविकास संस्थेने आपल्या ५० गावांत सुरू असलेल्या माधव संस्कार केंद्रातील चिमुकल्यांच्या साहाय्याने पुन्हा या भागात विपुल प्रमाणात वनश्री फुलविण्याचा ध्यास घेतला आहे. ओहोळ आणि पाणवठ्याच्या जागी हे चिमुकले एकत्र येऊन माती आणि शेणखत यांचे गोळे बनवून त्यामध्ये झाडांच्या बिया पेरून सीडबॉल्स बनविण्याचे काम करत आहेत.
गेल्या वर्षीच्या ९० टक्के झाडांची वाढ सर्व सीड्स बॉल्स पाऊस सुरू होताच डोंगर आणि टेकड्यांवर फेकण्यात येणार आहेत. मागील वर्षी याच मुलांनी जवळपास ३५ हजार सीडबॉल्स तयार करून टाकले हाेते. त्यापैकी ९० टक्के झाडे दाेन फुटांपर्यंत वाढल्याची माहिती शिक्षण विभागप्रमुख कैलास कुरकुटे यांनी दिली.
शिक्षक करत आहेत मार्गदर्शनया विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मदतीने साग, ऐन, हिरडा, बेहडा, आवळा, चिंच, शिसव, पांगारा, बहावा, बाभूळ, पळस, वड, पिंपळ, उंबर, सादडा, खैर,उंबर यासारख्या जंगली झाडांच्या बिया एकत्र करून त्याचे सुमारे एक लाख सीड्स बॉल्स तयार करण्याच्या कामात हात गुंतले आहेत.